श्रीकांत बोरावके :
आळंदी : केवळ स्वच्छतेचा दिखावा करत शहर स्वच्छतेचा 'ऑनलाईन' दिंडोरा पिटणार्या आळंदी पालिकेच्या आरोग्य विभागाचा 'ऑफलाईन' नाकर्तेपणा राज्यभरातून येणार्या भाविकांच्या जिवाशी खेळ करत असून, अस्वच्छता आणि प्रचंड असलेल्या घाणीतील स्वच्छतागृहांत जाण्याची वेळ भाविकांवर आली आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा' अभियानात काम दाखविण्यासाठी एकीकडे स्वच्छता करत असल्याचे उपक्रम राबवून नगरपालिकेचा आरोग्य विभाग आपण किती 'अपडेट' आहे हे दाखवत आहे. मात्र, प्रत्यक्षात क्षेत्रीय पातळीवर कामच दिसत नसल्याचे चित्र आहे. शहरातील पालिकेची जवळपास सर्वच स्वच्छतागृहे अस्वच्छ आणि भकास अवस्थेत दिसून येत आहेत. काही ठिकाणी महिला, तर काही ठिकाणी पुरुष युनिट बंद आहे, काही ठिकाणी स्वच्छतागृहांत प्रवेशदेखील करता येत नसल्याचे चित्र आहे.काही स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब आहेत आणि काही ठिकाणी वीजव्यवस्था बंद आहेत. प्रत्येक स्वच्छतागृहात नळाला पाणी नसणे हा तर कायमचा विषय बनला आहे.
शहरात पालिकेची भागीरथी नाला येथे दोन ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. घुंडळे आळी येथे एक स्वच्छतागृह आहे. ज्ञानेश्वर विद्यालयामागे एक स्वच्छतागृह आहे. मरकळ चौकात एक स्वच्छतागृहआहे. पालिकेच्या टाऊनहॉल मागेदेखील स्वच्छतागृह आहे सर्वच ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे वापरण्याच्या लायकीची राहिली नाहीत असे चित्र आहे. अनेक सामाजिक संघटनांनी, पक्षांनी कार्तिकी वारीत पालिकेला ही स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याची निवेदन देत मागणी केली होती. मात्र, पालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पालिकेची स्वच्छतागृहे वापरण्याच्या योग्यतेची नाहीत.
पालिका स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेचे कारण देत लाखोंची कामे केली जातात त्यासाठी नवीन टेंडर काढले जाते, देखभालच होत नसल्याने पुन्हा यातील साहित्य चोरीला जाते, खराब होते मग पुन्हा दुरवस्थेच कारण देत टेंडर काढले जाते. सोयी-सुविधांच्या नावाखाली पैसे कमावण्याचा धंदा आळंदीत सध्या तेजीत आहे.