वेल्हे (पुणे ): पुढारी वृत्तसेवा : वेल्हे व पानशेत परिसर जोडणार्या पानशेत – कादवे – विहीर घाट रस्त्याला संरक्षक कठडे, तसेच अरुंद वळणे असल्याने दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे. हा घाट 1963 मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी लाखो रुपये खर्च करून घाट रस्त्याचे रुंदीकरण व इतर कामे करण्यात आली. मात्र, खोल दरी, तसेच तीव— चढ – उतारावर संरक्षक कठडे उभारण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. शनिवारी (दि. 13) घाट रस्त्यावरील तीव— उतारावर दुधाचा टेम्पो उलटून अपघात झाला. त्यात चालक जखमी झाला.
कादवे ते विहीर गावापर्यंत आठ किलोमीटर अंतराचा घाट रस्ता अत्यंत बिकट आहे. उंच डोंगर फोडून कड्यातून रस्ता तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी संरक्षण कठडे आहेत, मात्र तीव— चढ-उताराच्या, तसेच अपघाती ठिकाणी कठडे नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. याकडे वेल्हे भोर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल पडवळ यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची मागणी पडवळ व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.