पुणे

पदवीप्रदान सोहळ्यांचा थाटमाट होणार बंद ; चंद्रकांत पाटील यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवीप्रदान समांरभ पुढील वर्षापासून बंद करण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत त्याबाबत सूचना देण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र थेट डीजीलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहे, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यामुळे विद्यापीठे, तसेच महाविद्यालयांमधील पदवीप्रदान सोहळ्यांचा थाटमाट बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या संवादात उच्च व तंत्र शिक्षणाशी संबंधित अनेक मुद्द्यांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी आणि नोकरीसाठी पदवी प्रमाणपत्राची सर्वाधिक आवश्यकता असते. अशा वेळी त्यांना हे पदवी प्रमाणपत्र डीजीलॉकरमध्ये उपलब्ध झाल्यास, त्यांचा फायदा अधिक होणार आहे, अशी भूमिकाही पाटील यांनी मांडली.

पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात काळे गाउन आणि मोठ्या टोप्या घालून, भव्य पदवीप्रदान समारंभ साजरे करण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र डीजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी लॉगइन करून, एका क्लिकवर ते प्रमाणपत्र कुठेही आणि कधीही डाउनलोड करू शकणार आहेत. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठांना वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्येही पदवीप्रदान समारंभ करता येतात.

SCROLL FOR NEXT