आईनेही घेतला जगाचा निरोप  Pudhari
पुणे

चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस सुरू असलेली झुंज अयशस्वी

एका लहान मुलीचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता

पुढारी वृत्तसेवा

चाकण : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनरचालकाने बेफाम वाहन चालवत जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली होती. 16 जानेवारी 2025 रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारांदरम्यान मंगळवारी (दि. 4) मृत्यू झाला. तब्बल 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

पौर्णिमा अंबादास गाढवे (वय 29, रा. रासे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची 9 वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी कंटेनरचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनांना धडक दिली. तसेच, पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम मारहाण केली होती. पुण्यात ससून रुग्णालयात त्याला दाखल केले होते. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT