पुणे

पुणे : अपहरण करून डॉक्टरला लुटणारी टोळी जेरबंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अपहरण करून एका डॉक्टरला लुटणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्याचा छडा लावत लोणी काळभोर पोलिसांनी ही लुटारू टोळी जेरबंद केली आहे. डॉक्टरची न्यायालयात पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू आहे. तिला न्यायालयाने पोटगी म्हणून वीस लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार डॉक्टरने पैशांची जुळवाजुळव केली होती. याच दरम्यान डॉक्टरचा दुसर्‍या महिलेसोबत विवाह ठरला होता. दोघे 'लिव्ह इन'मध्ये राहत होते. एकेदिवशी ती आपल्या गावी गेली. बोलता-बोलता भावजयीला तिने घरात पैसे ठेवल्याची माहिती दिली. मग तिने आपल्या साथीदाराच्या मदतीने डॉक्टरचे अपहरण करून त्याला लुटले.

माउली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षीरसागर, राहुल दत्तू निकम (27, रा. इंदापूर), नितीन बाळू जाधव (25, रा. इंदापूर), सुहास साधू मारकड (28), विद्या नितीन खळदकर (35, रा. सोलापूर), संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील (34, रा. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 9 ऑगस्टला वडकी भागात ही घटना घडली होती. बार्शी, इंदापूर, मिरज सांगली परिसरातून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. खंडणीसाठी भेकराईनगर येथील एका जनावराच्या डॉक्टरचे अपहरण करून गळ्याला चाकू लावत घरातून जबरदस्तीने 25 लाख रुपयांची रोकड, दोन लाख रुपये किमतीचे दागिने असा 27 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावजय विद्याने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला लुटण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील या तृतीयपंथीय व्यक्तीने फिर्यादीला श्वान आजारी असल्याचा फोन केला. श्वान आजारी पडल्याचे सांगून डॉक्टरला उपचारासाठी बोलावून घेतले. त्यानुसार डॉक्टर वडकीला गेले. तेथूनच तीन-चार जणांनी गाडीतून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. डॉक्टरच्या घराचा पत्ता विचारून घेतला. मोबाईल आणि घराच्या चाव्या जबरदस्तीने घेऊन घरातील 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने आणि 25 लाख रुपयांची रोकड असा तब्बल 27 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाले होते.

टोळीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, सोन्याचे दागिने, 12 लाखांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा..
राहुल आणि विद्या हे दोघे मित्र आहेत. विद्या हिनेच डॉक्टरला लुटण्याचा प्लॅन रचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी टोळीने सर्व खबरदारी घेतली होती. गुन्ह्यात एक चारचाकी गाडी आणि दुचाकीचा वापर करण्यात आला होता. पोलिसांना दुचाकीचा नंबर मिळाला. ती त्यांनी झूम अ‍ॅपवरून एका महिलेच्या नावाने घेतली होती. तर तांत्रिक विश्लेषणाद्वारे राहुल याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर या टोळीला जेरबंद केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT