भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली किंवा मुंबईत सरकार कोणाचेही असो, विकासकामासाठी निधी कसा आणायचा हे मामाला माहीत आहे. बेलवाडी गावासाठी मंजूर केलेला निधी मागील काळात आपणच मंजूर केला आहे, असा दावा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला. बेलवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या जाहीर सभेत भरणे बोलत होते. श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक बाळासाहेब पाटील, अॅड. रणजीत निंबाळकर, सचिन सपकळ, सर्जेराव जामदार, नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतीलाल जामदार, मयूर जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अॅड. शुभम निंबाळकर, पंकज जामदार, शिवसेनेचे संजय काळे, योगेश माने, उपसरपंच नामदेव इथापे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले, खोट्या माणसाला सहकार्य केले, तर चांगली माणस बाजूला जातात. गोरगरिबांची कामे करा अशी खा. शरद पवार, अजित पवार यांची शिकवण आहे. निवडणुका जवळ आल्या की काही लोक विषारी जातीपातीचा प्रचार करतात. केंद्रात खासदार सुप्रिया सुळे आहेत, मी आमदार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. तालुक्यात टँकरची मंजुरी घेण्यासाठीदेखील आमदाराची सही लागते. त्यामुळे जो काही निधी येणार आहे तो राष्ट्रवादीच्याच माध्यमातून येणार असल्याचे भरणे म्हणाले.
इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजूर केले होते. विरोधकांना ही योजना मंजूर झाल्याची कळताच त्यांनी सोलापूरकरांबरोबर इंदापूर तालुक्याचे भांडण लावून दिले. यामध्ये सोलापूरकरांची काही चूक नव्हती. इंदापूरच्या काही लोकांनी त्यांना भडकविण्याचे काम केले. तुम्हाला विकास करायचा होता, तर 19 वर्षांत का केला नाही, अशी टीका आ. भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता केली.