पुणे

सिंहगडावर ’नो थर्टी फर्स्ट’; वनविभागाने सायंकाळी सहा वाजता केला गड मोकळा

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : शनिवार, 31 डिसेंबर रोजी वर्षअखेरीस अनुचित प्रकार रोखण्यासाठी सिंहगड किल्ला सायंकाळी सहा वाजताच वनविभागाने मोकळा केला. गडावर जाणार्‍या दोन्ही बाजूंच्या घाट रस्त्यासह अतकरवाडी पायी मार्गावर गडावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी रात्रभर जागता पहारा ठेवला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या बेकायदा पार्ट्या, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. मात्र, तरीही सिंहगड, खडकवासला, डोणजे, खानापूरसह आडबाजूच्या राजगड, तोरणा, पानशेत, वरसगाव धरण भागातील हॉटेल, फार्म हाऊस पर्यटकांनी गजबजून गेले होते.

सिंहगडावर सकाळपासून पर्यटकांची गर्दी होती. वाहतुकीचे नियोजन केल्याने सिंहगड घाट रस्त्यावर काही अपवाद वगळता वाहतूक सुरळीत सुरू होती. गडावरील वाहनतळ दुचाकी, चारचाकी वाहनांनी भरले होते. दिवसभरात राज्यासह देशभरातील वीस हजारांवर पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. गडावरील खाऊगल्ली, हॉटेलमध्ये पर्यटकांची झुंबड होती. गडाच्या पायथ्याचे हॉटेलही गजबजून गेले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली सकाळपासून वनविभागाने वाहतुकीचे नियोजन केले. परिणामी, वाहनांची गर्दी होऊनही वाहतूक कोंडी झाली नाही. डोणजे-गोळेवाडी टोलनाक्यावर सचिन थोपटे, शंकर डोंगरे, नीलेश सांगळे आदी, कोंढणपूर फाट्यावर लहू पवार, राजू बडधे, रोहित पढेर आदी सुरक्षा रक्षक तैनात होते. घाट रस्त्यावर संदीप सांबरे ,शिवाजी लांघे,अर्जुन वाघे आदी रक्षक पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज होते. दुचाकीवरूनही रक्षक देखरेख करीत होते.

31 डिसेंबरला संध्याकाळी प्रथमच गड मोकळा
दुपारी चारनंतर गडावर पर्यटकांची वाहने सोडणे बंद केले. साडेपाच वाजल्यापासून गडावरील पर्यटकांना खाली जाण्यास बजावण्यात आले. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके व वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह सुरक्षा रक्षकांसह गडावर तळ ठोकून होते. सायंकाळी सहा वाजता गडावरील पर्यटक खाली गेल्याने इतिहासात प्रथमच 31 डिसेंबर रोजी गड सायंकाळी मोकळा झाला.

खडकवासला परिसरातही नाकाबंदी
दुपारपासून खडकवासला धरण माथ्यावर सिंहगड पानशेतकडे जाणार्‍या पर्यटकांची, वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मद्यपी पर्यटकांवर प्रतिबंधात्मक, बेकायदा मद्य बाळगणार्‍यांनावर कारवाईचे प्रशासनाने पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी हवेली व वेल्हे पोलिसांनी मुख्य रस्ते, तसेच धरण परिसरात उद्या 2 जानेवारी सकाळपर्यंत बंदोबस्त सज्ज केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT