पुणे

उड्डाणपूल जानेवारी 2024 मध्येच होणार; विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाबाबत ‘पुम्टा’चा निर्णय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेपेक्षा आधी एक वर्ष संपविण्याचा निर्णय पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. त्यामुळे जानेवारी 2024 मध्ये नवीन उड्डाणपुलाचा वापर सुरू होईल.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काम लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी बैठकीत लावून धरली. ती मागणी मान्य करण्यात आली. त्यासंदर्भात नवीन नियोजन आठवडाभरात तयार करून देण्यास मेट्रोच्या अधिकार्‍यांना सांगण्यात आले. 'पुढारी'मध्ये या पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करणारी बातमी दिनांक 22 सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाली होती, त्याचीही दखल या बैठकीत घेण्यात आली.

विद्यापीठ चौकातील जुना पूल दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आला. येत्या आठवड्यात नवीन दुमजली पुलाचे बांधकाम सुरू होत असून, ते नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिरोळे यांनी या चौकातील वाहतूक कोंडीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्यावर मंर्त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 'पुम्टा'ची आज बैठक झाली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिरोळे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

'पुम्टा'च्या बैठकीतील निर्णय
चतुःश्रृंगी पोलिस चौकीचे गेट उघडून विद्यापीठमार्गे वाहतूक वळविणार
पुणे विद्यापीठ ते वैकुंठ मेहता संस्था दरम्यान तात्पुरता रस्ता बांधणार
त्या रस्त्याने रॅम्पवरून भोसलेनगरकडे वाहतूक वळविणार
खडकी स्थानकालगतच्या भुयारी मार्गाची दुरुस्ती
मॉडर्न कॉलेजमधील रस्ता करून दुचाकी व तीनचाकी वाहने त्या मार्गावर वळविणार
रस्त्यावरील खड्डे भरून डांबरीकरण करणार
मनुष्यबळ वाढवून लवकर पूल बांधण्याची पीएमआरडीएला सूचना
अतिरीक्त वाहतूक वॉर्डनची नियुक्ती
गणेशखिंड रस्त्यावरील पदपथाची रुंदी कमी करणार

या चौकातून जाण्यास वाहनचालकांना मोठा त्रास होत असून, त्यांची बाजू मी विधानसभेत, तसेच आजच्या बैठकीत मांडली. मेट्रोचे काम तुमच्या वेळापत्रकानुसार करा, मात्र उड्डाणपूल डिसेंबर 2023 पर्यंत बांधून पूर्ण करा. त्यासाठी योग्य ते तांत्रिक नियोजन आखण्याची आग्रही मागणी मी बैठकीत लावून धरली. त्यानंतर, अधिकार्‍यांनी उड्डाणपूल दोन वर्षांऐवजी एका वर्षात बांधून वाहनचालकांना उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT