येरवडा; पुढारी वृत्तसेवा: येरवडा येथील विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर गोल्फ क्लब चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचे काम 82 टक्के झाले आहे. येत्या नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती उपअभियंता संदीप पाटील यांनी दिली. विमानतळाकडे जाताना तसेच डॉ. आंबेडकर चौक ते डॉन बॉस्को मार्गांवर ये-जा करणार्या वाहनांना नेहमी वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने या चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला.
या पुलाचे काम सुरू होऊन अडीच वर्षे झाली. मात्र, काही दिवस हे काम बंद होते. आता या पुलाचे काम 82 टक्के पूर्ण झाले आहे. गोल्फ क्लब चौकात सेंटर स्लॅबचे काम सुरू आहे. याशिवाय गुंजन चौक साइडला रॅम्प तयार करण्याचे काम सुरू आहे.या पुलाच्या कामांतर्गत नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी यशवंतनगरजवळ अंडरपास असणार आहे. या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यास विमानतळाकडे कमी वेळात पोहचणे शक्य होणार आहे. याशिवाय डॉ. आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक परिरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
या पुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत मंजूर झाला आहे. यामुळे हा पूल छत्रपती संभाजी महाराज पूल म्हणून ओळखला जाणार आहे.
असा आहे पूल
लांबी 615 मीटर
रुंदी 15.60 मीटर
पिलर 10
लेन 4