बावडा; पुढारी वृत्तसेवा; भीमा नदीमध्ये उजनी धरणातून 91 हजार 600 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमेची पूर परिस्थिती दुसर्या दिवशीही शनिवारी (दि. 17) कायम होती. भीमेवरील गणेशवाडी येथील पुलावर सुमारे पाच फूट पाणी असल्याने शनिवारी दुसर्या दिवशीही वाहतूक बंद होती. तसेच नदीवरील भाटनिमगाव, टणू, शेवरे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्याचप्रमाणे नदी पात्रालगतच्या काही शेतकर्यांची ऊस, कडवळ, मका पिके पाण्याखाली गेली आहेत.
भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे पोलिस पाटील शरद जगदाळे पाटील (टणू) यांनी सांगितले. दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत शुक्रवारी (दि. 16) 4.30 वाजेपासून सोडण्यात येणार्या 91 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा शनिवारी 6 वाजतादेखील कायम होता, त्यामुळे भीमा नदीची पूरस्थिती जैसे थे आहे.