पुणे

पुणे : एक दिवसाच्या मद्य परवान्यासाठी चढाओढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'पिनेवालो को, पिने का बहाना चाहिए…' या गीताचे बोल कानी पडताच नजरेसमोर येतो तो मद्याचा प्याला. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातील बारसह धाबे सजले आहेत. या उत्सवात मद्यपींकडून काही गडबड होऊ नये यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी बारचालकांनीच एक दिवसाचे मद्य परवाने घेऊन त्यांची सोय केली आहे. हे परवाने घेण्यासाठी व्यावसायिकांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, आतापर्यंत दीड लाख मद्य परवान्यांची विक्री झाली.

शहर आणि जिल्हा पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने वीकएंडच्या सुट्यांसाठी पुण्याकडे पावले वळतात. नाताळबरोबर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटनस्थळालगत असलेल्या धाबे आणि बारवर जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. रंगात भंग नको म्हणून मद्यप्रेमींची काळजी घेण्याचे काम व्यावसायिकांकडून दरवर्षी घेतले जाते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा थर्टीफस्ट खुल्या वातावरणात साजरा होत आहे. यामुळे व्यावसायिकांनी मद्यप्रेमींसाठी एक दिवसांचे परवाने घेण्याची तयारी आठ दिवसांपूर्वीच केली आहे. यात देशीसाठी दोन रुपये, तर विदेशीसाठी पाच रुपये शुल्क भरून एक दिवसांचा परवाना असणार आहे.

विभागाची चौदा पथके
उत्सव साजरा करताना मद्यपींकडून गोंधळ होऊ नये याची खरबरदारी विभागाकडून घेतली जात आहे. यासाठी विभागाने 14 नियमित पथके आणि 10 विशेष पथके तैनात केली आहेत. ही पथके फार्म हाऊस, रिसॉर्ट यावर विशेष लक्ष ठेवणार आहेत. यासह अवैध पार्ट्या व अवैधरित्या मद्य पुरविणा-या टोळ्यांवर लक्ष ठेवणार आहे. यासाठी ठिकठिकाणी नाके उभारण्यात आले असून, काही खब-यांच्या माहितीवरून कारवाई करणार असल्याची माहिती अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

SCROLL FOR NEXT