पुणे: अरे ढिल दे रे... आपला पतंग कापला, धागा लपेट... असे तरुणाईचे संवाद नदीपात्रात दिवसभर ऐकायला मिळाले. शहरातील सर्वच मंदिरांत महिलांनी दिवसभर वाण लुटून घरात सुख, समृद्धी, मांगल्य नांदू दे, अशी प्रार्थना केली. सायंकाळी नागरिकांनी ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी (दि. 14 जानेवारी) मकर संक्रांतीचा सण शहरातील नागरिकांनी उत्साहात अन् चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा केला. संक्रांत हा नव्या वर्षातील पहिला सण असल्याने घराघरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी अन् मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना तिळगूळ देत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि मांगल्याची कामना केली.
यानिमित्त घराघरांमध्ये सहकुटुंब तिळगुळाच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यात आला. लहान मुलांसह तरुणाईने पतंगबाजीचा आनंद लुटला, तर महिलांनी हळद-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत एकमेकींना वाण लुटत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिरांमध्येही यानिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम झाले.
पतंग उडवण्याचा लुटला आनंद
शहर आणि उपनगरांत तरुणांसह लहान मुलांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मध्यवर्ती पेठांसह डेक्कन, कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, कर्वेनगरसह उपनगरांतील सर्व गल्लीबोळांत पतंग उडवताना तरुणाईसह लहान मुले दिसत होती. तरुणाई खासकरून नदीपात्रात पतंग उडवताना दिसत होती. विविधरंगी आणि विविध आकारांतील पतंग उडवताना त्यांचा उत्साह पाहावयास मिळाला.
सर्वच मंदिरांमध्ये गर्दी
शहरातील सर्वच मंदिरांमध्ये विद्युतरोषणाई आणि फुलांची सजावट केली होती. पहाटेपासूनच महिलांसह आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली. घराघरांमध्ये पारंपरिक वेशभूषेत पूजाअर्चा करण्यात आली. तिळगुळाचे लाडू, वड्या, हलवा देऊन कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी, मित्र-मैत्रिणींनी स्नेहाचे नाते जोडले.
काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सणानिमित्त महिला व तरुणींनी काळ्या रंगाच्या साड्या आणि हलव्याचे दागिने खालून तळजाई टेकडीवर खास फोटोसेशन करत एकमेकींसोबत सेल्फी काढत ते सोशल मीडियावर अपलोड केले.