होळीच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग Pudhari
पुणे

होळीच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग

गोवर्‍या, ऊस, नारळासह पूजेच्या साहित्याला मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहर आणि उपनगरात होळीचा सण गुरुवारी (दि.13) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने होळीसाठी लागणार्‍या गोवर्‍या, ऊस, विविध प्रकारची फुले, नारळ आदी साहित्याने बाजारपेठेत लगबग पाहायला मिळत आहे.

बुधवारीही (दि.12) होळीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. मार्केट यार्डसह महात्मा फुले मंडईत पूजेसाठीचे साहित्य, रांगोळी, गोवर्‍या अशा विविध साहित्यांची खरेदी लोकांनी केली.

गुरुवारी होळीचा सण असल्याने बुधवारी (दि.12) ऊस, नारळ, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, कापसाच्या वाती, हार आणि फुलांच्या खरेदीलाही अनेकांनी प्राधान्य दिले. सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आणि सोसायट्यांत होळी दहन केले जाते.

त्यामुळे दरवर्षी गोवर्‍यांना मोठी मागणी असते. उपनगरासह जिल्ह्यातील विक्रेते मागणी लक्षात घेऊन गोवर्‍या आधीच तयार करून ठेवत असतात. त्यामुळे होळीच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोवर्‍या विक्रीसाठी बाजारात दाखल होत असतात.

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत गोवर्‍या, ऊस आणि नारळाच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागील वर्षी एका गोवरीची किमत 5 ते 7 रुपये होती. यंदा त्यात वाढ झाली आहे. या वेळी एका गोवरीची किमत 10 रुपये आहे, असेही त्यांनी नमूद केले.

होळी पेटवा रात्री नऊपर्यंत

होळीचा सण हा सध्या सामाजिक उत्सव असल्याने गुरुवारी (दि.13 मार्च) होळी सूर्यास्त झाल्यावर प्रदोष काळात म्हणजे साधारणपणे रात्री 9 पर्यंत पेटवावी आणि होळीचा सण साजरा करावा, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. तसेच, फाल्गुन शुक्ल पौर्णिमेस शुक्रवारी (दि.14 मार्च) चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार दिवसा असल्याने हे ग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणून यादिवशी ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT