सुनील जगताप :
पुणे : क्रीडा आणि शिक्षण विभागाच्या वतीने 2013 मध्ये विना गुणांकनाच्या धर्तीवर 42 खेळांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली. कालांतराने गुणांकन देण्यात येईल, असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले असून, अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या 42 खेळांतील तब्बल 5 लाखांहून अधिक खेळाडू, तर 7 हजार प्रशिक्षकांचे क्रीडा गुण मिळावे, यासाठी दहा वर्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा विविध संघटना करीत आहेत. शासनाच्या मागणीनुसार सर्व पत्रव्यवहाराची पूर्तता केली आहे. तरीही शासकीय पातळीवर उदासीनता दिसून येत आहे. शासनाच्या वतीने 42 खेळांच्या कागदपत्रांची पूर्तता करताना केवळ 25 खेळांच्या संघटनांनी पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे शासनाकडे जमा केलेली आहेत. या सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरही सरकारच्या वतीने दखल न घेतल्यास अनेक खेळाडूंचे क्रीडाक्षेत्रात मोठे होण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे.
या 25 क्रीडा संघटनांनी दिली कागदपत्रे
फिल्ड आर्चरी, म्युझिकल चेअर, हाफकिडो बॉक्सिंग, बुडो मार्शल आर्ट, लंगडी, फ्लोअर बॉल, जित कुने – दो, स्पीड बॉल, तेंग सु डो, युनिफाईट, थांग – ता मार्शल आर्ट, कुराश, फुटबॉल टेनिस, रोप स्किपिंग, टेनिस बॉल क्रिकेट, थायबॉक्सिंग, टेबल सॉकर, टेनिस व्हॉलिबॉल, जंपरोप, रस्सीखेच, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, टेनिस क्रिकेट, वोवीनाम, योंगमुडो या खेळ संघटनांचा समावेश आहे.
हा शेवटचा पत्रव्यवहार असून, शासनाने खेळाडू व संघटनेबाबत सहानुभूती ठेवावी, अन्यथा पुढील काळात खेळाडूंना नाइलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
– शाम राजाराम भोसले, अध्यक्ष, शालेय खेळ, क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्यग्रेस गुणांसाठी 25 विविध खेळांच्या संघटनांनी कागदपत्रांची पूर्तता आयुक्त कार्यालयाकडे केलेली आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे. हा निर्णय शासन पातळीवर प्रलंबित असून, नक्कीच शासन सकारात्मक विचार करेल.
– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय