पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतकर्यांना आतापासूनच चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. दूध उत्पादक शेतकरी आतापासूनच विकत चारा घेऊन दूध देणार्या जनावरांना खाऊ घालताना दिसत आहेत. उसाच्या वाढ्यालादेखील शेतकर्यांकडून मोठी मागणी वाढली आहे. सध्याच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यातील चारा संकटाची चाहूल लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्याच्या पूर्वभागात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शेतकर्याकडे दूध देणार्या संकरित गाई, म्हशी आहेत. यंदा उन्हाळ्यात निर्माण होणारी चाराटंचाई दोन ते तीन महिने अगोदरच निर्माण झाली आहे. एरवी दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यांत जनावरांच्या चार्याची टंचाई निर्माण होत असते. परंतु यंदाचा पावसाळा लांबला होता. त्यातच अतिपावसाचा फटका चार्याला बसला. या अतिपावसाने चारा सडला. यामुळे यंदा चाराटंचाईचे संकट लवकरच निर्माण झाले आहे.
उसाच्या वाढ्यांसाठी पाहावी लागते वाट
सध्या हिरवा चारा कोठेही शिल्लक नाही. विकतदेखील चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या परिसरात ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे उसाचे वाढे थोड्याफार प्रमाणात मिळत आहे. परंतु उसाचे वाढे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची अक्षरक्षः ऊस तोडणीच्या शेतात झुंबड उडते. वाढे करण्यासाठी शेतकर्यांना भीमाशंकर कारखाना रस्त्यावर तासन्तास ऊस टायर गाड्यांची वाट पाहावी लागते. तरीदेखील त्यांना वाढे मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.