Maharashtra Assembly polls  file photo
पुणे

Maharashtra Assembly Election: मतदारसंघातील नाराज, बंडखोरांचा गटच विजय निश्चित करणार

येत्या दोन दिवसांमध्ये आणखी बंडखोरी उसळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सुहास जगताप

विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासूनच जोरदार चुरस निर्माण झाली असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीसमोर उघड आणि छुपी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आहे, हा नाराज, बंडखोरांचा गटच मतदारसंघातील विजय नक्की करेल, असे चित्र आहे.

या दोन्ही राजकीय गटांमध्ये प्रत्येकी तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षांमध्ये किमान दोन जण असे एका मतदारसंघात दहा ते बारा जण विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यापैकी दोघांनाच उमेदवारी मिळणार असल्याने इतरांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जुन्नर, इंदापूर, मावळ या मतदारसंघात तर बंडाचे निशाण फडकले आहे. पुरंदरमध्येही वारे त्याच दिशेने वाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आपल्या पक्षातील तसेच इतर दोन मित्रपक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांना आपल्या बाजूला वळवून कामाला लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी रोखण्यासाठी त्यांची कसोटी लागेल. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात हीच अवस्था आहे. पुढील दोन दिवसांत काही ठिकाणचे उमेदवार नक्की झाल्यानंतर पुन्हा बंडखोरी उसळणार आहे. काही नेत्यांनी उघड बंडखोरी केलेली नसली तरी पुढील राजकारणात आपल्याला अडचण येऊ नये म्हणून पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराचा पराभव कसा होईल याचे नियोजन ते पक्के करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे. आत्ताच काही नेते त्या पद्धतीने काम करू लागले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये हे चित्र आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सर्वच पक्षात प्रस्थापित नेत्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर आहे. अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असताना ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांच्या लगत अशा नेत्यांची चवड निर्माण झाली, या दोन्ही नेत्यांनी तालुका- तालुक्यात एक-दोन सुभेदार तयार केले आहेत, पक्ष फुटीनंतर आपापल्या गटात हे नेते आता त्यांना डोईजड झाले आहेत. आपल्याशिवाय दोन्ही पवारांचे घोडे अडणार अशा समजुतीने ते उमेदवारीसाठी भांडू लागले आहेत, काही ठिकाणी या दोन्ही नेत्यांच्या गटातून पलटी मारून उमेदवारी खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपमध्येही राज्यातील सध्याच्या अडीच वर्षांच्या तसेच पूर्वीच्या पाच वर्षांच्या सत्तेच्या उबेने गडगंज झालेल्या नेत्यांची संख्या वाढली असल्याने तेथेही उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्री, दगड खाणी, वाळू-माती उपसा,औद्योगिक वसाहतीतील भंगार उचलणे, मजूर-कामगार पुरवठा अशा प्रकारचे निरनिराळे ठेके, प्रचंड नागरीकरणामुळे सुरू झालेला ’प्लॉटिंग’ व्यवसाय, सावकारी, स्व:ताच्या शहरालगतच्या जमिनी विकणे अशा निरनिराळ्या मार्गाने काही ठराविक वर्गाकडे प्रचंड पैसा निर्माण झाला आहे, हा वर्ग स्वत:चे धंदे अबाधित राखण्यासाठी राजकारणात घुसला असल्याने या वेळच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारीसाठी जोरदार चुरस असल्याचे दिसते, या पैशांच्या जोरावर काहींनी अपक्षाची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार अखेरचा दिवस असल्याने दोन दिवसात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT