पुणे

वेळ नदीवरील बंधारा तुडुंब ; पाणीटंचाई दूर होण्यास मदत

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तसेच मिनी बंधारा चासकमानच्या आवर्तनामुळे भरला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या दोन महिन्यांपासून वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु, चासकमानचे आवर्तन वेळ नदीतून सोडल्याने पाण्याची समस्या किमान महिनाभरासाठी दूर झाली आहे. "दै. पुढारी"ने नुकतेच चासकमानचे आवर्तन सोडण्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन व परिसरातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार वेळ नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयोग होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नियोजनानुसार चासकमानचे आवर्तन वेळ नदीतून वेळेत सोडल्यास शक्यतो पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत नाही तसेच शेतीसाठीदेखील या पाण्याचा उपयोग होतो. बंधार्‍यातील पाणी सुमारे महिनाभर पुरत असते. चासकमानचे आवर्तन टेलपर्यंत व वेळ नदीवरील सर्व बंधारे भरेपर्यंत सोडण्याची तसेच आवर्तन बंद करताना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा वेळ नदीतून पाणी सोडण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT