पुणे

पुणे : रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या काळात नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 'क' समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळून लावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना टोले, तत्कालीन शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फेब—ुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांकडून सुरू होता. या प्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्ला या पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने त्या वेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता.

या वेळी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेने फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणत्या स्वरूपाची माहिती गोळा केली, या आणि अशा स्वरूपाची माहिती या वेळी घेण्यात आली. याबाबतही चौकशी करण्यात आली होती. शुक्ला यांच्यासह इतरांवर भारतीय तार अधिनियम कलम 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

संभाषण वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप
शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदा टॅप करून त्या फोनमधील संभाषण तत्कालीन भाजप -सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

असे केले होते नेत्यांचे नामकरण 
नाना पटोले 'अमजद खान', तर बच्चू कडू 'निजामुद्दीन शेख' नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांच्या नावांसाठी कोडनेम वापरण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 'अमजद खान', बच्चू कडू यांच्या नावासमोर 'निजामुद्दीन बाबू शेख', संजय काकडे यांचे नाव 'अभिजित नायर', आशिष देशमुख यांचे नाव 'महेश साळुंके' अशा प्रकारे विविध नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी खास कोडनेमचा वापर करण्यात आला. त्यात त्यांना अमली पदार्थ तस्कर म्हणून दाखविण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT