पिंपरी : भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल बांधण्याच्या कामाची एकत्रित निविदा न काढता ती स्थापत्य व विद्युत अशी दोन वेगवेगळ्या कामांनुसार काढण्यात यावी. त्यामुळे निकोप स्पर्धा होऊन महापालिकेच्या खर्चात बचत होईल. परंतु, तसे न करता, अधिकारी व ठेकेदारांनी रिंग करून वाढीव दराची निविदा मंजूर करून तब्बल 25 कोटींचा भ—ष्टाचार केला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, अशी सूचना करीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांची एकप्रकारे कानउघाडणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आयुक्त सिंह यांच्याकडे 29 सप्टेंबर व 1 डिसेंबरला तक्रार केली आहे. आमदार जगताप यांनी म्हटले आहे, की भामा आसखेड येथे स्थापत्यविषयक जॅकवेल बांधणे, विद्युतविषयक पंपिंग मशिनरी पुरवठा करून बसविणे, त्यासाठी विद्युतपुरवठा यंत्रणा उभारणे या कामांची एकत्रित 120 कोटी खर्चाची निविदा काढण्यात आली.
विद्युत व स्थापत्यविषयक कामे वेगवेगळी आहेत. असे असताना दोन्ही कामाच्या अनुभव दाखल्याची जाचट अट घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात या दोन्ही कामांचा अनुभव असलेल्या ठेकेदारांची संख्या तुरळक असल्याने निविदेत स्पर्धा झाली नाही. त्यामुळे अधिकारी व विशिष्ट ठेकेदारांनी आर्थिक संगनमताने निविदा काढल्याचे स्पष्ट होते.