पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाची गंभीर दखल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशातील नेत्यांनी घेतली असून, पराभवाची नेमकी कारणे शोधण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील काही नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारणा केल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या विदर्भातील दोन जागांवर भाजपचा पराभव झाला. विशेषतः अमरावतीची जागा गमवावी लागली. दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यापाठोपाठ कसबा पेठ या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून झालेला पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळे महाविकास आघाडीचे मनोधैर्य वाढल्याचे आघाडीच्या नेत्यांच्या बोलण्यातून दिसून येते.
भाजपच्या काही स्थानिक पदाधिकार्यांनी अशी कोणतीही विचारणा प्रदेश नेत्यांकडून झाली नसल्याचा सावध पवित्रा मंगळवारी घेण्यात आला. पक्षाचे प्रदेशातील नेते पुण्यातच प्रचाराच्या काळात होते. त्यामुळे त्यांना त्या-त्या वेळी सर्व माहिती देण्यात आल्याचे काही जणांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही पदाधिकार्यांनी मात्र त्यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करून विचारणा केल्याचे सांगितले. प्रभागात कशामुळे मते कमी मिळाली? त्याची माहिती आम्ही वरीष्ठ नेत्यांना दिल्याचे या पदाधिकार्यांनी म्हटले आहे.
शहरातील भाजपच्या संघटनात्मक बदलाची सुरुवात लवकरच होणार आहे. भाजपमध्ये शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्ती तीन वर्षांसाठी असते. प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांनी सरचिटणीसपदी काही जणांची नेमणूक केली. प्रदेश कार्यकारिणीतील अन्य पदांवर लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्याचवेळी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या राज्यात बहुतेक ठिकाणी नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर स्थानिक नवीन कार्यकारिणी निवडली जाईल. मार्चअखेरीला या बदलाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात सध्या पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.
संघटनात्मक बदल लवकरच करणार असल्याचे सूतोवाच बावनकुळे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात केले होते. पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या पदाला तीन वर्षे झाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. नवीन अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली पुण्यातील निवडणुका होणार असल्याने त्या पदावर कोणाची नियुक्ती होणार? याबाबत पक्षकार्यकर्त्यांत उत्सुकतेने चर्चा सुरू आहे.