Political News: विधानसभा निवडणुकीत पुरंदर-हवेली मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने 18 जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली असल्याचे स्पष्ट झाले. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. तर, काही बंडखोरांचे बंड शमविण्यात महायुती व महाआघाडीच्या नेत्यांना यश मिळेल का? हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
पुरंदर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांनी मंगळवारी (दि. 29) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, हवेलीतून उबाठा पक्षाचे शंकर बबन हरपळे, संदीप बबन मोडक व पुरंदरमधून अभिजित मधुकर जगताप यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असणार आहे.
महायुतीने पुरंदर विधानसभेची उमेदवारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिली. सोमवारी (दि. 28) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदासंघात महायुतीत मोठ्या प्रमाणात बंड पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शरद पवार यांच्या पक्षाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना अधिकृत उमेदवारी दिली.
माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा उभारला आहे. पुरंदर-हवेलीत आघाडी आणि महायुतीत बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे.
झेंडेंच्या उमेदवारीने भुवया उंचावल्या
पुरंदर-हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. झेंडे यांच्या नातलगांचा मोठा गोतावळा संपूर्ण पुरंदर व हवेली तालुक्यात आहे.