Pune News: भाडेकरारासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम) ही प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरासह जिल्ह्यात सुरू केलेली प्रणाली असून यशस्वी ठरली आहे. आता ही प्रणाली राज्यभर लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीचा घरमालक आणि भाडेकरू यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच ती राज्यभर लागू करण्यात येणार आहे.
राज्यासह देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस होणारे घातपात, गुन्हे आणि इतर अनुचित घटनांच्या अनुषंगाने सुरक्षिततेसाठी मुद्रांक शुल्क विभागानेदेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत भाडेकराराची ‘आय सरिता’ प्रणाली विकसित केली आहे.
आता ही ‘आय सरिता 2.0’ या प्रणाली नव्याने राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम) ही संगणकीय प्रणाली राबविली आहे.
त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती लागलीच पोलिसांना मिळणे शक्य झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली ही प्रणाली राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येत असल्याचे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.
सीसीटीएनएस या संगणकीय प्रणालीचा प्रायोगिक प्रकल्प पुणे जिल्ह्यात राबविला आहे. या प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी, तसेच राज्यभरातील माहितीचा डेटा एका ठिकाणी संगणकीकृत सर्व्हरमध्ये संकलित करण्याबाबत नियोजन आहे.- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक