पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : कोलाड महामार्गावरील पिरंगुट घाटामध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच सिमेंटच्या विटा घेऊन जाणार्या टेम्पोचा झालेला भीषण अपघाताच्या आठवणी पुसत नाही तोच मंगळवारी (दि. 5) रात्री एक व्यावसायिक कार (एमएच 12 एनएक्स 7807) तब्बल 50 फूट खोल दरीमध्ये कोसळली. चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून गाडी झाडावर अडकून राहिली. चालक बाहेर पडल्यानंतर गाडी पुन्हा खाली कोसळली. पौडचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार तसेच हवालदार दीपक पालके यांनी चालकाला प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला.
एका चालकाने पोलिसांना सांगितले की, पाच मिनिटांपूर्वीच एक गाडी पिरंगुट घाटातून खाली दरीमध्ये कोसळली. ही गाडी पुण्याकडून कोकणामध्ये प्रवासी घेण्यासाठी निघाली होती. यामध्ये चालक आशिष राजेंद्र जाधव (रा. धनकवडी, पुणे) हा एकटाच होता. ही माहिती मिळताच कुंभार आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने चालकाला बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. नशीब बलवत्तर तर म्हणून जीव वाचल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. अपघाताबाबत मला काहीही समजले नाही आणि अचानक गाडी रस्ता सोडून खाली गेली असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा तपास पौड पोलिस करत आहेत.
रंबलर्स पट्टे असूनही जड वाहने वेगातच
पिरंगुट घाटामध्ये वेग कमी करण्यासाठी रंबलर्स पट्टे मारलेले आहेत. परंतु त्या पट्ट्याने फक्त चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा वेग कमी होत आहे. जड वाहने अजूनही वेगातच जात आहेत.
हेही वाचा :