कार पेटवून देण्याचा प्रकार Pudhari
पुणे

जुन्या भांडणातून कार पेटवली ; तिघांवर गुन्हा, एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

जुन्या भांडणातून घरासमोर लावलेली कार पेटवून देण्याचा प्रकार शिरवली (ता. बारामती) येथे शनिवारी (दि. 28) मध्यरात्री घडला. याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एकास अटक केली आहे. याप्रकरणी नितीन मारुती पोंदकुले (रा. शिरवली, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहन प्रकाश बर्गे याच्यासह इतर दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पोंदकुले यांनी त्यांच्या मालकीची कार (एमएच 42 बीबी 3777) शनिवारी (दि. 28) साडेनऊ वाजता घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री रोहन प्रकाश बर्गे व इतर दोन जणांनी कारवर दगडफेक करत पेट्रोल ओतले आणि कार पेटवून दिली. या आगीत कारचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने हा प्रकार लागलीच लक्षात आल्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. कारमधील सीएनजी गॅसची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक फौजदार संजय मोहिते हे तपास करीत आहेत.

मागील आठवड्यात शिरवलीत दरोड्याचा प्रकार घडला होता. त्याच दरोड्यातील रोहन बर्गे हा एक संशयित आरोपी आहे. त्यातूनच नितीन पोंदकुले यांचीही कार जुन्या भांडणातून पेटवून दिल्याची चर्चा होती. पोलिसांनी रोहन बर्गेला अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT