Pudhari
पुणे

बंगल्याच्या आवारात लपलेल्या बछड्याला सोडले

पुढारी वृत्तसेवा

मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील बंगल्याच्या आवारातील जनावरांच्या गोठ्यात लपून बसलेल्या बिबट बछड्याला पकडून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची त्याच्या आईशी भेट घडवली. याच वेळी त्याची आई बंगल्याजवळील ज्वारीच्या शेतात आक्रमक पवित्र्यात होती. वन अधिकार्‍यांनी प्रसंगावधान राखत त्या बछड्याला बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून बाहेर काढून दिले. हा बछडा अंदाजे 5 महिने वयाचा होता.

कारवस्तीत शेतकरी भाऊ साळबा मुळे यांचा बंगला आहे. याच बंगल्याच्या आवारात असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्याचा बछडा बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला आणि तेथे लपून बसला. साधारण पावणेअकरा वाजेपर्यंत तो बंगल्यात होता.

बछडा दिसताच मुळे कुटुंबीयांनी तातडीने वन विभागाला कळवले. त्यानुसार वनपाल अनिता होले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, सुशील ढवळे, स्वप्निल पाटे, सुशांत भुजबळ, मांजरवाडीचे पोलिस पाटील सचिन टाव्हरे, रामकृष्ण चोपडा, तुषार टेके, डॉ. महेंद्र ढोरे, शिवाजी थोरात, संतोष मुळे, मोहन मुळे, सुयोग भापकर आदी ग्रामस्थ तेथे दाखल झाले.

बछड्याला रेस्क्यू करत असताना बाजूच्या ज्वारीच्या शेतामध्ये असणारी त्याची आई मादी बिबट्या गुरगुर करत जवळ येत असल्याचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत ताबडतोब रेस्क्यू टीमला सावध केले. तो बछडा न पकडता त्याला संरक्षक भिंतीच्या बाहेर त्याच्या आईच्या दिशेने सोडून दिले. त्यानंतर तो आईच्या कुशीत विसावला. काही वेळाने दोघेही तेथून निघून गेले.

...म्हणून त्याला सोडून दिले

मंगळवारी (दि. 8) एक बछडा याच परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला आहे. त्यानंतर दुसराही बछडा पकडला जाऊ शकत होता. मात्र, दोन्ही बछडे दुरावल्याने त्यांची आई आक्रमक होण्याची शक्यता होती, त्यामुळे हा दुसरा बिबट्या पकडून सोडून देण्यात आला, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

गावात आत्तापर्यंत 12 ते 13 बिबटे पकडले

गावात आत्तापर्यंत 12 ते 13 बिबटे पकडण्यात आले आहेत व अजूनही या भागात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. या भागात अजूनही 10 ते 15 बिबटे असल्याचा अंदाज आहे. प्रचंड प्रमाणात बिबटे असल्याने ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा ग्रामस्थ आक्रमक झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT