सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प 82 कोटी तुटीचा  File Photo
पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प 82 कोटी तुटीचा

साधक-बाधक चर्चा होऊन आज बजेट होणार मंजूर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा 565 कोटी 64 लाख 54 हजार रुपये जमेचा आणि 648 कोटी 3 लाख 83 हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प शनिवारी सायंकाळी उशिरा अधिसभेत सादर केला. हा तुटीचा अर्थसंकल्प असून, ही तूट 82 कोटी 39 लाख 29 हजारांची आहे.

व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी विद्यापीठाचा अर्थसंकल्प अधिसभेत मांडला. या अर्थसंकल्पात विद्यापीठातर्फे दिल्या जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ करण्यात आली. या शिष्यवृत्तीत 1 कोटी 85 लाखांनी रक्कम वाढविण्यात आली आहे.

यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजना, महात्मा जोतिराव फुले अर्थसाहाय्य योजना, स्वामी विवेकानंद अर्थसाहाय्य योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज अर्थसाहाय्य योजनांचा समावेश आहे.

विद्यापीठात नव्याने बांधकाम सुरू करण्यात येणार नाही. मात्र, पूर्वीपासून जे बांधकाम सुरू आहे, ते पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व बांधकामामध्ये नियमितता, गतिमानता, कालबद्धता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विद्यापीठ आवारातील इमारती बांधकामासाठी एकूण 58 कोटी व इतर सुविधा-सुधारणांसाठी 13 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही शिंगणापूरकर यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅनिमल हाऊस बांधकामासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी चौदा मजली संशोधन इमारत तसेच विद्यार्थी वसतिगृहाच्या दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात येत असून, प्रत्येक वसतिगृहाची 513 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे.

विद्यापीठातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम व नियोजनबद्ध करण्यासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागांत लिफ्ट बसविण्यासाठी 25 लाख तरतूद प्रस्तावित केली आहे. विद्यापीठातील विद्युतीकरण सक्षम करण्यासाठी 1 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात एका ठिकाणी अडीच कोटी रक्कम तब्बल 25 कोटींची दाखविण्यात आली. त्यावर अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला स्पष्टीकरण विचारले. यावरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

अधिसभा सदस्य डॉ. विनायक आंबेकर यांनी यावरून सभात्याग केला. परंतु, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या विनंतीला मान देऊन डॉ. आंबेकर पुन्हा सभागृहात आले. त्यानंतर शनिवारचे अधिसभेचे कामकाज संपले. आता आज रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा अधिसभेचे कामकाज सुरू होईल. या वेळी अर्थसंकल्पातील विविध बाबींवर चर्चा करून तो मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर वार्षिक अहवाल, क्रीडा अहवाल मांडण्यात येईल तसेच शक्य झाल्यास प्रस्ताव आणि प्रश्नांवर चर्चा होईल आणि अर्थसंकल्पीय अधिसभेची सांगता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT