पुणे

शेंडकरवाडीतील पूल अनावश्यक उंचीचा

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : जुना पूल पाडून नवा बांधण्यामागे स्थानिक ग्रामस्थांची सोय करणे, हा हेतू असतो. मात्र, प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे निरा डावा कालव्यावर शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे नव्याने बांधत असलेला पूल मात्र अनावश्यक उंचीचा झाला असल्याने शेतकरी, प्रवासी यांच्यासाठी गैरसोयीचाच ठरणार आहे. पूल उंच होत असल्यामुळे आता नाइलाजास्तव दोन्ही बाजूला उतार काढावा लागेल, असा साक्षात्कार अधिकार्‍यांना झाला आहे. त्यामुळे हा पूल मअसून अडचण नसून खोळंबाफ असा ठरणार आहे.

शेंडकरवाडी, करंजे, चौधरवाडी, मगरवाडी अशा गावांना या पुलावरून कालवा ओलांडून शेतात जावे लागते. तसेच निरा-बारामती रस्त्यावरील कोर्‍हाळे, वडगाव, होळ, सोरटेवाडी ग्रामस्थांना शेंडकरवाडीवरील सदर पुलावरून सोमेश्वर मंदिराला जाणे अधिक सोईस्कर ठरते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पावणेदोन कोटी रुपये निधी मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी बहुधा कार्यालयात बसूनच डिझाइन ठोकून दिले असावे, तर जलसंपदा खात्याच्या तज्ज्ञांनीही पूल बांधताना पुरेसे गांभीर्याने घेतले नसावे. त्यामुळे पूल भरावापासून तब्बल दोन मीटर उंचीचा झाला आहे. या पुलाचे सध्या काम सुरू आहे.

मात्र, तो नेमका कसा होणार, किती उंचीचा होणार, याची ग्रामस्थांना कल्पना नव्हती. ते अधिकार्‍यांवर विश्वास टाकून मोकळे झाले होते. मात्र, आता अधिकारी हुशार असतात, हा ग्रामस्थांचा भ्रम दूर झाला आहे. जे अडाणी माणूस सांगू शकतो ते अधिकार्‍यांच्या लक्षात आले नाही. अखेर याची तक्रार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. आता पवार यांनी पूल उंच झाल्याने दोन्ही बाजूला उतार काढा, असा आदेश दिला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्याच एका जबाबदार पदाधिकार्‍याने दिली.

जलसंपदा खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एमकमेकांवर टोलवाटोलवी करीत आहेत. मात्र, सदर पुलाच्या दोन्ही बाजूंनी उतार काढायला कितपत संधी आहे, याबाबत ग्रामस्थ शंका व्यक्त करीत आहेत. यामुळे शेतकरीवर्गात नाराजीची भावना आहे. उसाच्या गाड्यांची वाहतूक पुलावरून कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. आधीचा जुनाच पूल बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ढकलाढकली
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. एम. मुखेकर म्हणाले, की दोन्ही बाजूंनी उतार देऊन उंची मर्यादित करणार आहोत. गावच्या बाजूलाही उतार बसतो आहे. आम्ही सुरुवातीला नीट करीत होतो. पण, जलसंपदा खात्यानेच तशी मंजुरी दिली नाही. कालवा नूतनीकरण होणार म्हणून आम्हाला तसे करायला सांगितले; अन्यथा एक मीटरने उंची कमी करता आली असती.

बारामती सा. बां.ची ऐतिहासिक कामगिरी
सव्वाशे किलोमीटर अंतर असलेल्या डावा कालव्यावर कुठेही इतक्या उंचीचा पूल नाही. ही ऐतिहासिक कामगिरी बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असल्याची टीका आता होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT