पुणे; पुढारी वृत्तसेवा: रात्रीचा ठिक 1 वाजला, धडाम् आवाज आला आणि पाठोपाठ धुराचे लोट उसळले आणि अवघ्या सहा सेकंदात चांदणी चौकातील पुलाचा बराचसा भाग जमिनीवर कोसळला. मात्र, पुलाचा काही भाग तसाच राहिल्याने स्फोट पूर्णपणे यशस्वी झाला की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्फोट करण्याची वेळ रात्री 2 वाजताची देण्यात आली होती. त्यासाठी महामार्गावरील वाहतूक 11 वाजताच पूर्ण बंद करण्यात आली.
परंतु, वेळेआधीच संपूर्ण तयारी झाल्याने रात्री 1 वाजता स्फोट घडविण्यात आला. स्फोट होण्याच्या अर्धा तास आधी 'कुणीही 200 मीटरच्या आत थांबू नका, स्वत:चा जीव धोक्यात घालू नका,' अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आणि त्यानंतर 20मिनिटात स्फोट झाला. मात्र, धुरळा खाली बसल्यानंतर पुलाचा काही भाग तसाच असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर …कंपनीचा फलक असणारे कापडही तसेच दिसत होते. त्यानंतर लगेचच एक्सेव्हेटर, पोकलेंड, टिप्पर तातडीने पुलाकडे गेले आणि मलबा उपसण्यास सुरूवात केली. पुलाचा काही भाग तसाच राहिल्याने स्फोट अयशस्वी झाला का अशी शंका उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
मात्र, त्याबाबत अधिकृत खुलासा लागलीच होऊ शकला नाही. पुलाचा राहिलेला भाग एक्सेव्हेटरच्या सहाय्याने तोडला जाईल असे पुलाजवळ उपस्थित अधिकार्यांनी पत्रकारांना सांगितले. हा मलबा येत्या सहा तासात काढण्यात येऊन सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असा विश्वासही अधिकार्यांनी व्यक्त केला. महामार्गावरील पूल पाडण्यापूर्वी दोनशे मीटर परिघाचा परिसर सायंकाळी सहा वाजता निर्मनुष्य करण्यात आला. वाहतूक नियोजनासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पूल पाडल्यानंतर सकाळपर्यंत राडारोडा हटविण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक मजूर यंत्रसामग्रीसह घटनास्थळी होते. महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावण्यात आले होते. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते. पूल पाडण्यासाठी साधारण 35 मिमी व्यासाची आणि दीड ते दोन मीटर खोलीची तेराशे छिद्रे पाडण्यात आली. त्यात 600 किलो इमल्शन स्फोटके भरली होती. एक हजार 350 डिटोनेटर उपयोगात आणून नियंत्रित पद्धतीने स्फोट करण्यात आला.
पूल पाडतानाची काळजी
पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. पुलावर व त्याच्या बाजूला साडेसहा हजार मीटर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. त्यावर साडेसात हजार चौरस मीटरचे जिओ टेक्स्टाईल अंथरले. त्यावर जड वजन ठेवण्यासाठी वाळूच्या 500 पिशव्या ठेवण्यात आल्या. तसेच, आठशे चौरस मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता.