वाडा : पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री खोर्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणार्या 240 फूट उंची असलेल्या पहिणे नवरी सुळक्यावर फोर्ट एडव्हेंचर पुणे आणि मावळे माउंटन रेंजर्स नाशिकच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरीत्या आरोहण केले. युवा गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावत केलेली ही साहसी मोहीम ठरली. या मोहिमेची सुरुवात लक्ष्मणपाडा, पहिणे गाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथून झाली. सुरुवातीला शेतालगत असणार्या बांधाने जात छोटा ओढा पार करावा लागतो. येथूनच घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग नवरा-नवरी सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो. गिरिप्रेमी संस्थेचा राजगुरुनगर येथील युवा गिर्यारोहक अक्षय भोगाडे आणि नाशिकचा चेतन बेंडकुळी यांनी लीड क्लाइंबिंग करत आरोहणाचा मार्ग रोपच्या मदतीने सुरक्षित केला.
लीड आरोहणासाठी साधारणः दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून चिकाटीने आरोहण करावे लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा आहे. पहिला 40 फुटी टप्पा पार केल्यावर दोन्ही डोंगरांच्या मधोमध असणार्या खिंडीतून चिमणी क्लाइंब करत 40-50 फुटी टप्पा पार करावा लागतो. पुढचा 70-80 फूट टप्पा हा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. यात चिमणी क्लाइंबसोबत खिंडीतून वाहणारा जोरदार वारा मानसिक आणि शारीरिक कसोटी घेतो. सर्व आव्हानांना सामोरे जात टीमने ही मोहीम यशस्वी केली. यामध्ये बेस कॅम्पच्या नेतृत्वाची जबाबदारी सचिन पुरी यांनी पार पडली. या आरोहणात विशाल वायकर, प्रतीक्षा शिंदे, प्रियंका जढार आदी ट्रेकर्स सहभागी झाले होते.
हेही वाचा :