विदेशी पक्ष्यांचे ’बर्ड पार्क’ अद्याप कागदावरच! Pudhari
पुणे

Pune Bird Park: विदेशी पक्ष्यांचे ’बर्ड पार्क’ अद्याप कागदावरच!

मोर, घुबड, गिधाडे या पक्ष्यांसह अन्य समृद्ध पक्षीवैभव अनुभवयाला मिळावे; पुणेकरांची अपेक्षा

प्रसाद जगताप

पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्रस्तावित ‘बर्ड पार्क’चे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे तब्बल 60 कोटी रुपये खर्चून उभारले जाणारे हे ‘बर्ड पार्क’ अद्याप कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात समृद्ध पक्षीवैभव पुणेकरांना अनुभवता यावे, यासाठी बर्ड पार्कच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी प्रशासनासह पालिकेकडे होत आहे.

पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेत, राजीव गांधी संग्रहालयाचा मास्टर प्लॅनमध्ये 2023 मध्ये सुधारणा करून, तो स्मार्ट मास्टर प्लॅन तयार केला. त्यानुसार येथे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी देशी-विदेशी पक्षी पाहता यावेत, याकरिता ‘बर्ड पार्क’ उभारण्याचे नियोजन केले. (Latest Pune News)

परंतु, गेल्या दोन वर्षांपासून पक्षिप्रेमी पुणेकरांच्या वाट्याला ‘बर्ड पार्क’च्या बाबतीत वाट पाहवीच लागत आहे.पुणेकर ञ्च्बर्ड पार्क’च्या प्रतीक्षेत आहेत. ‘बर्ड पार्क’च्या दिरंगाईमुळे विदेशी पक्षी पाहाण्याचे स्वप्न भंग होईल की काय, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

सद्य:स्थितीत प्राणिसंग्रहालयात केवळ मोर, घुबड आणि गिधाडे यांसारखे काही मोजकेच पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे लहान मुलांना विविधरंगी आणि आकर्षक देशी-विदेशी पक्षी दाखवण्याची इच्छा असणार्‍या पालकांचा हिरमोड होत आहे. पुणेकरांची तुलना नेहमीच इतर शहरांमधील प्राणिसंग्रहालयांशी केली जाते.

म्हैसूरचे राजा चामराजेंद्र प्राणिसंग्रहालय आणि दिल्लीतील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय त्यांच्याकडे असलेले असंख्य विविध प्रकारचे प्राणी, पक्षी प्रजातींसाठी ओळखले जातात. या संग्रहालयांमध्ये देशीच नव्हे, तर अनेक दुर्मीळ विदेशी पक्षीही पाहायला मिळतात. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातही अशाच प्रकारची विविधता असावी, अशी अपेक्षा नागरिक प्रशासनाकडे व्यक्त करत आहेत.

‘बर्ड पार्क’ संकल्पना नेमकी काय आहे?

पुणे महानगरपालिकेने राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणासाठी 2023 मध्ये सुधारणा करून स्मार्ट मास्टर प्लॅन तयार केला. या योजनेत देशी आणि विदेशी पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी भव्य ‘बर्ड पार्क’ उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. सुमारे 60 कोटी रुपये या प्रकल्पासाठी लागणार आहेत.

तलावाच्या रमणीय परिसरात हे ‘बर्ड पार्क’ साकारणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, या घोषणेला आता बराच काळ लोटला तरी प्रत्यक्ष कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. 2023च्या सुधारित स्मार्ट मास्टर प्लॅननुसार या ‘बर्ड पार्क’मध्ये 59 विविध प्रकारचे देशी आणि विदेशी पक्षी आणले जाणार होते.

‘बर्ड पार्क’मध्ये 59 प्रकारचे

देशी-विदेशी पक्षी... करकोच्याच्या जातीचा पेंटेड स्ट्रोक, व्हाइट नॅक्ड स्ट्रोक, व्हाइट्स इबिस, ग्लॉसी इबिस, स्पूनबिल, शेल्डक, पिन्टेल डक, स्पॉटबिल डक, ग्रे पेलिकन, हेडेड गुस, स्कॅलि मुनिआ यांसह अनेक 59 प्रकारचे देशी-विदेशी पक्षी या बर्ड पार्कमध्ये पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.

आम्ही लहान मुलांना प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी दाखवण्यासाठी घेऊन येतो. पण, पक्ष्यांमध्ये इथे फक्त मोर, गिधाड अन् घुबड दिसतात. इतर प्राणिसंग्रहालयांप्रमाणे आम्हाला विदेशी पक्षी, प्राणी कधी पाहायला मिळतील, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
- आशिष दाभाडे, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT