पुणे

कात्रज : रुंदीकरणाअधीच दुभाजकाचे काम सुरू

अमृता चौगुले

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाच्या मागणीनुसार पथ विभागाने रस्तदुरुस्तीचे काम हाती घेतले असून, गोकुळनगर चौकात नवे दुभाजक टाकण्यास सुरुवात केली. मात्र, रस्ता रुंद करण्यापूर्वीच दुभाजक टाकण्यात येत असल्याचे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे नागरिकांसह, वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण जागा हस्तांतरणाअभावी रखडले आहे.

84 मीटरऐवजी 50 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासने ठरविले आहे. मात्र, या कामासाठी जागा हस्तांतरित करावी लागणार असून, त्यासाठी वेळ लागणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व वाहतूक पोलिस उपयुक्त विजय मगर यांनी काही दिवसांपूर्वी पाहणीदौरा केला होता. त्यानुसार प्राथमिक उपाययोजना म्हणून मुख्य रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण, साइडपट्ट्यांचे डांबरीकरण आणि गोकुळनगर ते राजस सोसायटी चौकादरम्यान नवे दुभाजक टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण विभागाने कारवाई करत अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. मात्र, त्या ठिकाणी रस्त्याचे काम न केल्याने पुन्हा अतिक्रमणे 'जैसे थे' झाली आहेत. त्यामुळे रुंदीकरणासाठी आता पुन्हा अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. या मुख्य रस्त्याला परिसरातील लोकवस्तीतून अंदाजे 40 समांतर रस्ते येऊन मिळतात. दुभाजक टाकले आणि सर्व्हिस रस्ते नसतील, तर दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येऊन अपघात होण्याचा धोका निर्माण होणार आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. केवळ गोकुळनगर चौकात 200 मीटर अंतरादरम्यान दुभाजक टाकले असून, एका ठिकाणी साइटपट्ट्या खोदल्या आहेत. त्यामुळे 'हे काम कधी पूर्ण होणार की, रुंदीकरणाप्रमाणे तेदेखील रखडणार?' असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या रस्त्यावर वाहनांचे अवैध पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होऊन कोंडी
होत आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण व साइडपट्ट्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरुवातीला करावे लागणार आहे. केवळ दुभाजक टाकून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही. 84 किंवा 50 मीटर रस्ता रुंदीकरणाच्या मुख्य उद्देशापासून प्रशासनाने दूर जाऊ नये.

                                                   – प्रभाकर कदम, जनसेवा प्रतिष्ठान

रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार दुभाजक टाकण्याचे काम सुरू केले आहे. साइडपट्ट्यांचे डांबरीकरणही वेगाने पूर्ण केले जाईल.

                                          -धनंजय गायकवाड, उपभियंता, पथ विभाग.

या रस्त्यावर दुतर्फा नो-पार्किंग यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनचालकांनी रस्त्यावर वाहने पार्किंग करू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल.

                     – प्रशांत कणसे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT