पुणे

पिंपरखेड स्मशानभूमीचे सुशोभीकरणाने रुपडे पालटले

अमृता चौगुले

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील स्मशानभूमी परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून स्मशानभूमी परिसरात आपले योगदान देत विविध रोपट्यांची लागवड केल्याने परिसर सुशोभित झाल्याने स्मशानभूमीचे रुपडेच पालटून गेले आहे.

गावाची लोकसंख्या मोठी असल्याने स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंत्यविधी व दशक्रिया विधी होत असतात; मात्र पावसाळ्यात अनेकदा स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय किसनराव बोंबे यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या सहकार्यातून तसेच माजी उपसरपंच रामदास दरेकर यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ मोठी देणगी दिली होती. यासोबतच लोकवर्गणी गोळा करून या परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या हेतूने संपूर्ण परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने व गावातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय दशरथ वरे यांच्या कुटुंबीयांकडून सभामंडपासाठी देणगी मिळाल्याने भव्य सभामंडप साकारला आहे. नव्याने तयार झालेली संरक्षक भिंत, तसेच सुसज्ज स्वच्छतागृह बांधकाम झाल्याने परिसर स्वच्छ व सुंदर झाला असल्याचे पहायला मिळते.

ग्रामस्थांनी श्रमदान करत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी उपसरपंच विकास वरे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, बाळशिराम ढोमे, रामदास ढोमे, वैभव उंडे, सत्यवान पोखरकर, निवृत्ती बोंबे, देवराम ढोमे, लक्ष्मण गायकवाड, रामदास दरेकर, गोविंद जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT