बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती-निरा राज्यमार्ग प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावर सातत्याने छोटे-मोठे अपघात सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. सध्या माळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून या ठिकाणी कोणत्याही सूचनांचे फलक अथवा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.
याशिवाय करंजेपूल, वडगाव निंबाळकर, खामगळपाटी, पणदरे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने अगोदरच रहदारीसाठी धोकादायक बनलेल्या रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. जीवघेणा प्रवास सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोर्हाळे बुद्रुक येथेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. कोर्हाळे येथील पेशवेवस्ती, माध्यमिक विद्यालय, बसस्थानकापासून जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळ, कठीण पूल, 15 फाटा येथे रस्त्यावर जीवघेणे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कडेची धोकादायक आणि अडथळा ठरणारी झाडे तोडली जात आहेत.
मात्र, झाडांच्या फांद्या बाजूला करून रस्त्यावरच झाडांचे ओंडके तसेच ठेवले जात आहेत, त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अगोदरच अत्यंत धोकादायक पद्धतीची रचना असलेल्या गतिरोधकांमुळे प्रवाशांचे मणके ढिले झाले असतानाच रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावरील उसाची सुरू असलेली धोकादायक वाहतूक कमी होताना दिसत नाही. याच मार्गावर एस. टी. बसच्या सर्वाधिक फेर्या होत असल्याने एस. टी.ला उत्पन्नही जास्तीचे मिळते. मात्र, सुविधा देण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे.
रस्तासुरक्षा सप्ताह केवळ दिखाव्यापुरता
नुकताच रस्तासुरक्षा सप्ताह झाला. मात्र, आरटीओ प्रशासनाने नेहमीप्रमाणेच ठरावीक ठिकाणी रस्तासुरक्षेचे कार्यक्रम घेतले. मात्र, ऊस वाहतूक करणारी वाहने, विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, काळ्या- पिवळ्या वाहनांतून सुरू असलेली वाहतूक, विनाकागदपत्रे सुरू असलेली वाहतूक, शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून आणली जात असलेली वाहने, जड वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मालाची सुरू असलेली वाहतूक, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने रस्तासुरक्षा सप्ताह केवळ दिखाव्यापुरता साजरा झाल्याचे बोलले जात आहे. या सप्ताहातून नेमके काय साध्य केले? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.
गळीत हंगामामुळे वाहनांची प्रचंड गर्दी
बारामती-निरा हा राज्यमार्ग विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अरुंद रस्ता आणि वाहनांची वाढलेली संख्या, साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असल्याने उसाची वाहतूक करणार्या वाहनांची वाढलेली संख्या, धोकादायक झाडे, जीवघेणे गतिरोधक, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यालगत असलेली शाळा-महाविद्यालये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेली मोठमोठी अतिक्रमणे, यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. यासाठी रस्ता चारपदरी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.