पुणे: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 2024च्या कॅलेंडर वर्षात 73 लाख रुपयांवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांत घरांच्या सरासरी किमतीत 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी विक्री झालेल्या घरांमध्ये 45 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची परवडणार्या घरांचा वाटा 2020च्या तुलनेत 55 वरून 30 टक्क्यांवर घसरला आहे. परवडणार्या श्रेणीतील घरांचा पुरवठाच घटल्याची माहिती समोर आली आहे.
क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्सच्या अहवालानुसार गेल्या वर्षी पुण्यात 90 हजार घरांची विक्री झाली असून, त्यातून 65 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2019 मध्ये 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल होती. त्यात पाच वर्षांत 116 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी विक्री झालेल्या घरांपैकी 70 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा हिस्सा 60 टक्के आहे.
या किंमत श्रेणीतील घरांचा वाटा 2020 मध्ये 85 टक्के होता. गत पाच वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री पाचपटीने वाढली आहे. त्या उलट परवडणार्या घरांचा टक्का 55 वरून 30 वर घसरला आहे. परवडणार्या घरांचे प्रमाण कमी होत आहे. या श्रेणीतील घरांचा पुरवठा कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
खरेदीदारांची पसंती बदलली
कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 70 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत 60 टक्के हिस्सा होता, तर 2020 मध्ये तो 85 टक्के होता. यावरून प्रशस्त मालमत्तांकडे खरेदीदारांचा कल वाढल्याचे दिसून येते. याशिवाय गेल्या पाच वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री पाचपट वाढली आहे, जी लक्झरी आणि प्रीमियम घरांची वाढती मागणी दर्शविते.
घरांसाठी हिंजवडी-खराडीला प्राधान्य
पुणे शहर आणि परिसरात विक्री झालेल्या घरांपैकी 75 टक्के विक्री केवळ तीन ठिकाणी झाली आहे. त्यात हिंजवडी-महाळुंगे परिसर, खराडी-वाघोलीच्या आणि उत्तर पुण्यात पिंपरी-चिंचवडलगतच्या भागात मागणी वाढली आहे.
कोथरूड-बावधन महागले
कोथरूड-बावधनमध्ये 2020 ते 2024 या कालावधीत विक्री झालेल्या युनिट्सच्या सरासरी किमतीत तब्बल 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, पुण्यातील घरांच्या सरासरी किमतीत गेल्या पाच वर्षांत 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सदनिकांचे वाढलेले आकार आणि प्रकल्प खर्चात वाढ झाल्याने सदनिकांची किंमत वाढली आहे.
महानगरांमध्ये पुणे स्वस्त
पुण्यात घरांची सरासरी किंमत 73 लाख रुपये आहे. बंगळुरू (1.35 कोटी) आणि हैदराबाद (1.75 कोटी), मुंबई (2.13) आणि दिल्लीतील घरांची सरासरी किंमत 3.08 कोटी रुपये आहे.