Alandi News: श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक आळंदीत दाखल होऊ लागले असून, त्यांच्या उपस्थितीने अलंकापुरी फुलू लागली आहे. ‘ज्ञानोबा तुकोबा’चा जयघोष आणि पारायणाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
यात्रेनिमित्त आळंदीमध्ये वारकरी साहित्याची दुकाने सजली आहेत. वारकरी भाविक गीता, भागवत पुराण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, संत श्रीनामदेव यांचे अभंग व एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, श्रीतुकारामांची गाथा अशा विविध ग्रंथ पुस्तकांची खरेदी करताना दिसून येत आहेत. तर काही टाळ, मृदंग, वीणा, पेटी खरेदी करताना दिसत आहेत. तसेच तुळशी हार, फुले आणि प्रसादाची दुकानेही सजली आहेत.
इंद्रायणी घाटावर इंद्रायणीमातेच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याने घाट सजून गेला आहे. आळंदीत यात्रेसाठी आलेले वारकरी भाविक श्रद्धापूर्वक ते साहित्य घेऊन इंद्रायणीमातेचे पूजन तसेच पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करत आहेत.
शहरात विविध ठिकाणी हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. हरिनाम गजर, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष सुरू आहे. वारकरी भाविक भजन व कीर्तनाच्या भक्तिरसात न्हाऊन गेले आहेत. सिध्दबेटच्या अजाण वृक्षबागेत अनेक भाविक ग्रंथ पारायण करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे आळंदी शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेले दिसून येत आहे.
विश्रांत वड, सिद्धबेट येथे दर्शनासाठी गर्दी
संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेल्या वारकर्यांच्या दिंड्यांनी राहुट्या उभारल्या आहेत. शेजारीच मंडप टाकून ज्ञानेश्वरी सप्ताह, कीर्तन, भजन सुरू आहे. राहुट्यांमध्ये कोणी विश्रांती घेत आहे, तर राहुट्यांशेजारी वारकरी भाविकांच्या भोजनव्यवस्थेसाठी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. श्रीमाउली मंदिर, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत, विश्रांत वड व सिद्धबेट येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.