पुणे

पळसदेव : वातावरणातील बदलामुळे विदेशी पक्ष्याचे आगमन लांबले

अमृता चौगुले

प्रवीण नगरे

पळसदेव : चांगले आणि पोषक वातावरण, मुबलक प्रमाणात अन्न तसेच प्रजनन व संगोपनासाठी चांगला अधिवास असणार्‍या उजनी धरण परिसरात दूर अंतरावरून परदेशातून अनेक जातींचे विविध पक्षी दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात हजेरी लावतात. परंतु या वर्षी निसर्गातील बदलाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सध्या या जलाशय परिसरात विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. जगभरात झालेल्या वातावरण बदलाचा पक्ष्यांना त्रास झाला आहे. वातावरणातील बदल आणि पावसाचा फटका यामुळे हे घडले आहे. अद्यापपर्यंत पक्ष्यांसाठी हवे असणारे वातावरण तयार न झाल्याने उजनीवर येणारे विदेशी व विशेषतः सर्वांचे आकर्षण असणारे फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांची मांदियाळी अद्यापपर्यंत दिसून आलेली नाही.

यावर्षी परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने परिसरातील उजनी जलाशयासह तलावदेखील ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे पक्ष्यांसाठी लागणारा अन्नसाठाही मुबलक प्रमाणात आहे. बदलत्या हवामानामुळे व बदललेल्या वातावरणामुळे विदेशी पक्षी उशिरा येतील, असा अंदाज पक्षीतज्ज्ञ व पक्षी निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

काही पक्षी हिमालय पार करण्यापूर्वी तिबेट, रशिया, मंगोलिया, युरोप, कझाकिस्तान येथून हजेरी लावतात. हे पक्षी ऑक्टोबरमध्येच उजनीवर दाखल होतात, परंतु नोव्हेंबर संपत आला तरी त्यांचा अद्याप मागमूस लागला नाही.

प्रथम पाहणी आणि नंतर येतात थवे
पक्ष्यांच्या हजारो किलोमीटर प्रवासाबरोबर राज्याच्या विविध ठिकाणी ते पोषक वातावरण व खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात मिळत असल्याने 4 हजार ते जवळ जवळ 25 हजार किलोमीटर अंतर पार करून उजनीवर विदेशी पक्षी येतात. उजनी जलाशयावर अगोदर थोडे पक्षी येऊन खाद्यपदार्थांची उपलब्धता आहे की नाही याची पाहणी करून जातात व पुन्हा मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

यंदा परतीचा पाऊस दमदार झाल्यामुळे धरण काठोकाठ भरलेले आहे. त्यामुळे पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने आच्छादित होऊन पक्ष्यांना उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे. शिवाय अचानक पडणारी थंडी व लगेच ढगाळ वातावरण निर्माण होणे या कारणांमुळेही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये निश्चितता राहिली नाही. त्यामुळे त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.

                                                                        डॉ. अरविंद कुंभार,
                                                                ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, अकलूज

SCROLL FOR NEXT