बारामती: गावच्या यात्रेपूर्वी माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझ्या आई-वडिलांचे मुंडके कोयत्याने उडवेन, अशी धमकी दिल्याने बारामती तालुक्यातील कोर्हाळे खुर्द येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केली. यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
आजही आपल्या समाजात अशा घटनांमुळे अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत डॉ. गोर्हे यांनी व्यक्त केले.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता 112 या पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.
महिला सहायता संस्था जसे की, स्त्री आधार केंद्र यांच्याकडे संपर्क साधून मदत घेता येईल. पालकांनीही मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजुतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही. आपली जबाबदारी आहे की अल्पवयीन मुलींना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय आयुष्य मिळावे, असे मत डॉ. गोर्हे यांनी व्यक्त केले.
मुख्य आरोपीला अटक; चार दिवसांची पोलिस कोठडी
अल्पवयीन मुलीला दिलेल्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील मुख्य आरोपी विशाल दत्तात्रय गावडे याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली. त्याला बारामती न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याला 15 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झालेले प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे हे तिघे अद्याप फरार आहेत. यासंबंधीचा तपास सुरू असल्याची माहिती वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी दिली.