पुणे

पानशेत ‘ड्रंक, हीट अँड रन’मधील आरोपी अद्यापी मोकाटच!

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे (ता. हवेली) चौकात खानापूर येथील निष्पाप तरुण गणेश रामचंद्र जावळकर (वय 38) याला दारूच्या नशेत चिरडणारा स्कार्पिओ जीपचालक उद्योगपती मोकाट फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडला. पतीला दारूच्या नशेत चिरडून ठार मारणार्‍या उद्योगपतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय मिळावा यासाठी गणेशची पत्नी मेघा जावळकर या हवेली पोलिस ठाण्यापासून ते जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत याचना करत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून त्या वणवण भटकत आहेत.

मात्र, अद्यापही पोलिसांनी दारूच्या नशेत वाहन चालवून गणेश रामचंद्र जावळकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला नाही. उद्योगपती भूषण सुभाष देशमुख (वय 37, रा. कोंढवे धावडे) हा सिंहगडकडून पुण्याकडे स्कार्पिओ जीप (एमएच 12 व्हीके 3999) भरधाव वेगाने चालवत होता. त्या वेळी त्याने गणेश जावळकर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गणेश हा जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी मेघा गंभीर जखमी झाली. सुदैवाने त्यांचा दीड वर्षाचा मुलगा श्रेयस हा बचावला. त्यानंतर हवेली पोलिसांनी मद्यधुंद उद्योगपती जीपचालक भूषण सुभाष देशमुख याला अटक केली होती. मात्र, नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍याचा दबाव

आरोपी उद्योगपतीला वाचवण्यासाठी शहर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दबाव आणल्याने निष्पाप गणेशला न्याय मिळाला नाही, अशी तक्रार गणेशच्या नातेवाइकांनी केली आहे. गणेश हा कुटुंबात एकमेव कमवता होता. त्याच्या पश्चात पत्नी मेघा, मुलगा श्रेयश, आई, भाऊ असा परिवार आहे.

याप्रकरणी आरोपी भूषण देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करून रीतसर कारवाई करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून आरोपीला कायद्यानुसार शिक्षा करण्यात येणार आहे. याबाबत नातेवाइकांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल.

– भाऊसाहेब ढोले पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग

डोणजे पेट्रोल पंपासमोर अपघात घडला, त्याचे सीसीटीव्ही फुटेज तसेच सिंहगड पायथ्याच्या बारमधून आरोपी त्याचे साथीदार बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तसेच गणेशच्या अंगावर आरोपी स्फार्पिओ जीप भरधाव वेगाने घातली. या घटनेनंतर रस्त्यावरील नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. असे असताना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही.

– सुरेश तांगुदे, गणेश जावळकर यांचे मेहुणे व माजी सरपंच, खडकवाडी.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT