वानवडी: वानवडीत ठिकठिकाणी मोकाट श्वानांची संख्या वाढली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट श्वानांची नसबंदी तसेच लसीकरण झाले असले तरी श्वान चावा घेत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
श्वान चावल्यानंतर रुग्णालयात धाव घेऊन लस घ्यावी लागते. परंतु, श्वान आहे त्याच जागी मोकाट फिरत असतात. त्यामुळे इतरांना देखील चावण्याची शक्यता असते. लसीकरण किंवा नसबंदी झाली असली तरी चावा घेत असलेल्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, यासाठी वानवडीतील नागरिकांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे.
वानवडी गावठाण व परिसरात खासगी व पालिकेच्या शाळा आहेत. शाळकरी मुले, ज्येष्ठ महिला व पादचार्यांना मोकाट श्वानांनी चावा घेतला आहे. शाळकरी मुलांवर कुर्त्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने शाळेसाठी मुलांची ने-आण करणारे पालकही त्रस्त झाले आहेत.
याबाबत महापालिका अधिकार्यांकडे अनेकदा तक्रार केली असूनही त्याकडे आरोग्य अधिकार्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे वानवडी गावातील नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवून महापालिका आयुक्तांचा निषेध केला आहे.
नागरिकांच्या त्रासाची दखल घेऊन भटक्या श्वानांवर कारवाई करण्याबाबत सुनील वाळुंज, अश्विनी बनकर, प्रिया फुले, सचिन गव्हाणे, ओमकार डोके, सीमा तुगाणे, आयेशा शेख, शारदा बोराटे, विजय वाळुंज अशा 53 नागरिकांनी सह्यांचे पत्र संबंधित अधिकार्यांना दिले आहे.