पुणे

बेल्हे : मंगल कार्यालयाकडे कुटुंबप्रमुखांचा कल

अमृता चौगुले

सुरेश भुजबळ

बेल्हे(पुणे) : प्रत्येक कुटुंबप्रमुख हा आर्थिक परिस्थितीनुसार वर किंवा वधूचा विवाह सोहळा करीत असतो. पूर्वीच्या काळात शेतकरी हा सोहळा दारातच करीत होता. काळ बदलला तसा हळूहळू मांडवांची जागा शहरात तसेच गावात मंगल कार्यालयांनी घेतली आहे. त्यामुळे पूर्वी मांडवांत होणारे विवाह सोहळे आता मंगल कार्यालयांत विसावले आहेत. एकत्रित कुटुंबपद्धती, गावकी-भावकीमध्ये आपुलकी, वेळेचे गणित आदी कारणांमुळे मांडवातील सोहळ्यांना "शुभ मंगल सावधान" म्हणण्याची प्रथा रुजू लागली आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह होत होते. त्या काळात मंगल कार्यालये ओस पडली होती. परंतु, सध्या मंगल कार्यालये गजबजली आहेत. धूमधडाक्यात विवाह करण्याची इच्छा आणि स्वप्न आता प्रत्येक वधू-वरासह त्यांच्या आई-वडिलांचे साकार होत आहे. मोठा खर्च करून मुलाचे किंवा मुलीचे लग्न मोठ्या हॉलमध्ये धूमधडाक्यात कसे होईल, याकडे वधू-वर पक्ष बघत आहेत. परंतु, यामध्ये ग्रामीण भागातील जुन्या चालीरीती लोप पावत आहेत.

गावात विवाहासाठी आलेली पाहुणेमंडळी त्यांच्या गावातील नातेवाइकांच्या गाठीभेटी घेत खुशाली विचारत असत. पूर्वी शक्यतो लग्न मुलीच्याच दारात अथवा गावातील मंदिराजवळ होत असे. नवरदेवाचे वऱ्हाड आले की त्यांचा मानपान राखला जात होता. सरबत, हळद व विवाह झाले की पटांगणात पंगत दिवसभर असायची. परंतु, आता ग्रामीण जुन्या चालीरीती हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. दारात, गावात, मांडवांत होणारे सोहळे हॉलमध्ये होऊ लागले आहेत. आता फक्त जुन्या सोहळ्यांमधील आठवणी आणि चालीरीतींना उजाळा मिळत आहे.

गावाच्या कौतुकाची प्रथा लोप

वेळेवर, मुहूर्तावर विवाह होत होते. सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध होत असे. सर्वांची दक्षता घेतली जात असे. गावकी-भावकीचा दबदबा असायचा. आपल्या गावाचे नाव राखले जावे म्हणून जो-तो झटत असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक गावात झालेल्या लग्नाचे नाव काढत असत. दोन्ही विवाह मालकाबरोबरच गावचेही कौतुक करीत होते.

सर्व बाबींना मिळाला पूर्णविराम

पूर्वी गावात विवाह म्हटले की संपूर्ण गाव त्या विवाहकार्यात सहभागी व्हायचा. नवरदेवाला आणायला मुराळी जाणे, जाणवस घर, नवरदेवाला श्रीवंदनासाठी ढोल-लेझीम खेळ करणे, लगीन घरी मांडव, लाइट, पाणी, बाजारहाट आदी व्यवस्था, पाहुण्यांचा मानसन्मान आदी अनेक कामांत गावातील सौ तसेच पुरुषांचा तसेच भावकीचा सहभाग होता. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली जात होती. परंतु, काळानुरूप ते बंद झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT