निमगाव दावडी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी हंगामात कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरी पिकाकडे वळत आहेत. यंदाही शेतकर्यांचा उन्हाळी बाजरी पिकाकडे अधिक कल असल्याचे दिसून येते. खेड तालुक्यातील शेतकर्यांनीही कांदा व बटाटा काढणीनंतर उन्हाळी बाजरीची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रात बाजरी उत्पादन चांगले होण्याची शक्यता शेतकर्यांनी वर्तविली आहे.
पावसाळ्यात बाजरी पिकावर कीडी-रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी, उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकर्यांनी बाजरी पीक पावसाळ्यात घेण्याऐवजी उन्हाळ्यात घेण्यावर भर दिला आहे. उन्हाळी बाजरी शुभ्र व चमकदार असल्याने भावदेखील चांगला मिळतो. तसेच, चाराही चांगल्या प्रतीचा मिळत असल्याने शेतकरी हमीशीर पीक म्हणून बाजरी पिकांकडे पाहू लागले आहेत.
आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करीत असतात. यापैकी खेडमधील निमगाव दावडीसह वाफगाव, कळूस, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव अशा अनेक गावांत बाजरीची पेरणी झाली आहे. यापूर्वी पावसाळी बाजरी क्षेत्र अत्यंत कमी होते. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता आणि पावसाळ्यात काढणी वेळी पाऊस पडल्याने पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होत असे. तसेच, तयार झालेल्या बाजरीला ऊनदेखील मिळत नव्हते. त्यामुळे बाजरीचा दर्जा चांगला मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात सर्वत्र पाणी उपलब्ध झाल्याने उन्हाळी बाजरी क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या काही भागांत बाजरीच्या खुरपण्या सुरू आहे. तर, काही ठिकाणी पीक दाणेदार झाले आहे.