पुणे

पुणे : मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा : अजित पवार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्वजांनी निर्माण केलेल्या मंदिरांचे जतन तसेच त्यांचा जीर्णोद्धार होण्याची गरज आहे. त्यामुळे या मंदिरांचे आयुष्य वाढेल. तसेच, पुढच्या शंभर पिढ्यांना देवाचे दर्शन व आशीर्वाद मिळेल, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काढले.
शिवाजीनगर (गावठाण) भांबुर्डे येथील श्री वृध्देश्वर सिध्देश्वर जीर्णोध्दारीत मंदिरातील रसिकशेठ धारीवाल सभामंडप मंदिर विद्युत रोषणाई संचाचे उद्घाटन पवार व आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) पार पडले. या वेळी पवार बोलत होते. कार्यक्रमास, आमदार सिध्दार्थ शिरोळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उद्योजक पूनित बालन, माजी नगरसेवक अ‍ॅड. श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'पुरातन वास्तूचा जीर्णोध्दार करताना बांधकामातील दगडाला रंग वापरता कामा नये. मूळ रूप टिकवून ठेवल्यास ते दिसायलाही छान वाटते. तसेच दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना त्रास कमी होऊन त्यांना सहज दर्शन मिळेल अशाप्रकारे सुविधा निर्माण करून देण्यास प्राधान्य द्यायला हवे. समाजात वावरताना प्रत्येकाने एकमेकांच्या धर्म, पंथांचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्राला संत, मंहत, शूरवीर तसेच प्रगत पुरोगामी विचारांची गौरवशाली परंपरा लाभली आहे.'

धारीवाल म्हणाल्या, 'शिरूर येथील रामलिंगाचे मंदिर हे धारीवाल कुटुंबीयांचे श्रध्दास्थान आहे. रसिकलाल धारीवाल यांना या मंदिरातच प्रचिती येऊन महादेवाने दिलेल्या कौलातून त्यांना यश प्राप्त झाले.' सहाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले व प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेले मंदिर नव्याने भक्तांसाठी खुले झाले आहे. येत्या काळात याठिकाणी अभ्यासिका तयार करून धार्मिकतेबरोबर शैक्षणिकही वारसा जोपासण्याचे काम ट्रस्टमार्फत करण्यात येईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट यांनी नमूद केले. या वेळी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थानचे विश्वस्त संजय सातपुते यांनी केले.

सहावे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातच
देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील जोतिर्लिंगाबाबत राजकारण सुरू आहे. सध्याच्या घडीला कोणी काहीही बोलतोय. त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. राज्याच्या उपमुमख्यमंत्र्यांनीही सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातच असल्याबाबत स्पष्ट केले आहे. यापूर्वीच बारा ज्योतिर्लिंगामध्ये या ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यात आला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT