बारामती: बारामती तालुक्यातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एका महिलेकडून नग्न व्हिडीओ कॉल करण्यात आले. त्यांनाही नग्न होण्यास सांगितले. नकार दिल्यास चॅटिंग व व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारातून दोघांनी त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार रुपये उकळले.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक पांचाळ व सिद्धांत गगनभिडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित 54 वर्षीय शिक्षक बारामती तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत आहेत. त्यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली. (Latest Pune News)
फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर त्यांचे खाते आहे. मे 2025 मध्ये शाळेला सुट्या असताना त्यांना एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर त्या खात्यावरून त्यांच्याशी चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर त्याच इन्स्टाग्राम खात्यावरदेखील त्यांना रिक्वेस्ट आली, त्यांनी ती स्वीकारली.
काही दिवसांनी समोरील खात्यावरून एका महिलेने त्यांना व्हिडीओ कॉल केले. नग्नावस्थेतील या महिलेने त्यांनाही कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यांनी नकार दिला असता माझ्यासोबत केलेले चॅटिंग व व्हिडीओ कॉलचे स्क्रिनशॉट व्हायरल करेन अशी धमकी देण्यात आली.
भीतीपोटी या शिक्षकाने कपडे काढले. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेक पांचाळ याने या शिक्षकाला फोन केला. तुमचे नग्न व्हिडीओ माझ्याकडे आहेत, मी आताच ते तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत, बघून घ्या असे तो म्हणाला. फिर्यादीने व्हॉट्सअॅप बघितले असता स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर याच प्रकारचे काही व्हिडीओ पाठविण्यात आले.
पांचाळ याने 2 लाख रुपये द्या, नाही तर तुमचे व्हिडीओ मी व्हायरल करेल, तुम्ही शिक्षक आहात, गटशिक्षणाधिकार्यांना हे व्हिडीओ पाठवून तुमची नोकरी घालवेन अशी धमकी देत शिवीगाळ केली. पैसे दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी शिक्षकाने काही रक्कम त्याला पाठवली.
त्यानंतर पांचाळ याने त्याचा मित्र सिद्धांत गगनभिडे याच्या फोन पे क्रमांकावर 30 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. 7 जुलै रोजी 70 हजार रुपये घेण्यासाठी हे दोघे थेट शिक्षकाच्या गावातच दुचाकीवरून आले. त्यांनी ही रक्कम फोन पेद्वारे स्वीकारली, त्यानंतर ते निघून गेले.
दि. 29 ऑगस्ट रोजी अभिषेक पांचाळ याने सिद्धांत याच्यासोबत तुमच्या गावात आलो आहे, तुम्ही आज मला 1 लाख रुपये द्या, आपण तुमचा व्हिडीओचा विषय मिटवून टाकू, पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करणार अशी धमकी दिली. फिर्यादीने घडलेला प्रकार पुतण्या व इतरांना सांगितला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात फिर्यादी शिक्षकाकडून एकूण 1 लाख 15 हजार 350 रुपये उकळण्यात आले.