पुणे

Income Tax Return | मिळकतकरातील सवलतीसाठी सर्वेक्षण; सवलतीचे फॉर्म जागेवरच भरून घेणार

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून मिळकतकरामध्ये दिल्या जाणार्‍या चाळीस टक्के सवलतीसाठी पात्र असलेल्या मिळकतींसह वापरातील बदल आणि आकारणी न झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम मिळकतकर विभागाने हाती घेतले आहे. या सर्वेक्षणादरम्यान चाळीस टक्के सवलतीस पात्र असलेल्या व स्वतः राहत असलेल्या मिळकतधारकांकडून पीटी-3 हा फॉर्म जागेवरच भरून घेतला जाणार आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने मागील आर्थिक वर्षापासून निवासी मिळकतींना पुन्हा चाळीस टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. 2019 मध्ये ही सवलत बंद करण्यात आली होती. त्यामुळे 2019 पासून सुमारे साडेचार लाखांहून अधिक मिळकतींना शंभर टक्के कर भरावा लागत होता. ही सवलत पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने या मिळकतधारकांकडून पीटी 3 अर्ज भरून घेतले. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुदत संपल्यानंतर प्रशासनाने उर्वरित मिळकतधारकांना शंभर टक्के कर आकारणी सुरू केली. यामुळे या मिळकतधारकांमध्ये मोठी नाराजी होती. विविध राजकीय पक्षांनीही या मिळकतधारकांना सवलत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला होता.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने चाळीस टक्के सवलत न मिळालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केला आहे. हे सर्वेक्षण करताना वापरातील बदल, कराची आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोधदेखील घेतला जाणार आहे.

जीआयएस सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 1 एप्रिल 2018 पासून 96,122 मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द झाली. 1 एप्रिल 2019 नंतर नव्याने बांधकाम झालेल्या 1,98,296 मिळकतींनाही ही 40 टक्के सवलत देण्यात आलेली नाही. नव्याने समाविष्ट 23 गावांमधील 1,68,771 मिळकतींनाही ही सवलत मिळालेली नाही. अशा एकूण 4,63,189 मिळकतींना ही 40 टक्के सवलत मिळालेली नाही. 40 टक्के सवलत मिळण्यासाठी पीटी 3 अर्ज सादर करण्याच्या मुदतीत केवळ 90,749 मिळकतधारकांनीच पीटी 3 अर्ज भरला. एकूण 3,72,440 मिळकतधारकांनी हा अर्ज भरलेला नाही. त्यामुळे आता पालिकेनेच पुढाकार घेत हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या सेवकांमार्फत मिळकतकर सवलत रद्द झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आवश्यक पुरावे सादर करणार्‍या मिळकतधारकांची सवलत पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

– बी. पी. पृथ्वीराज, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT