पुणे: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या मिळकतकर आकारणीचा तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावांना ग्रामपंचायत कराच्या दुप्पट दराने मिळकतकर आकारावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेने याबाबत नकार दर्शवून अशी आकारणी शक्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे आता या बैठकीत पालिका आपली जुनी भूमिका कायम ठेवते की कमी दराने कर प्रस्तावित करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Latest Pune News)
गेल्या आठवड्यात प्रलंबित प्रश्नांवर झालेल्या बैठकीत गावकर्यांनी सर्वांत आधी मिळकतकराचा मुद्दा मांडला होता. यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करीत पालिका अधिकार्यांना फटकारले. “ग्रामपंचायतीच्या दुप्पट कर आकारणीबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे पत्र असताना निर्णय का झाला नाही? इतका कालावधी पालिकेने नेमके केले तरी काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर आता मुंबईत होणार्या बैठकीसाठी महापालिकेचे अधिकारी ऑनलाइन सहभागी होणार आहेत. या चर्चेनंतरच समाविष्ट गावांतील पुढील मिळकतकर आकारणीचा अंतिम निर्णय होणार आहे.