पुणे

शिरगाव : देवांच्या गुणगौरवाबरोबर देतो मुली शिकवण्याचा संदेश : तरुण वासुदेव आकाश वाईकर

अमृता चौगुले

शिरगाव : पहाटेच्या वेळी दारात येऊन देवांचे भजन ऐकले आणि वासुदेवाचे नाव ओठांवर आले नाही, असे महाराष्ट्रात होणार नाही. सध्या सर्वत्र चांगली थंडी पडत आहे आणि त्यात पहाटेच दारात येवून देवांचे गुणगौरव करणारा वासुदेव आला तर सकाळ अधिकच ताजीतवानी आणि दिवस अगदी चांगला जातो आहे. सध्या सोमाटणे आणि परिसरात रोज कोणत्या ना कोणत्या गावातील लोकांची सकाळ ही परंपरा आणि आधुनिकता यांच्या सुरेख संगम घालून उजाडते आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याला कारण आहे सध्या या भागात पहाटे लोकांच्या दारात जावून देव देवतांच्या स्तुतीबरोबर मुलगी वाचवा मुलगी शिकवा असा संदेश देणारा आकाश वाईकर हा आधुनिक वासुदेव.

हा अगदी तरुण असणारा वासुदेव बारामती तालुक्यातील जळोची गावचा गेल्या काही वर्षापूर्वी मावळात पोटापान्याच्या शोधात आला आणि इकडचाच झाला. आकाश हा इतरत्र कामाला जात असला तरी थंडीच्या दिवसात पवण मावळातील वेगवेगळ्या गावात जावून आपली पारंपरिक वासुदेवाची कला सादर करतो. या कलेला परंपरेबरोबर तो आधुनिकतेचीही जोड देतो.

आणि पारंपरिक अभंगाबरोबर काही स्वरचित आणि काही समजा सुधारकांच्या कविता गाणी म्हणतो. यात झाडे लावा झाडे जगवा.लेक वाचवा लेक वाढवा .व्यसनापासून दूर रहा,मुलगा मुलगी भेद नको, मुलीचा कुणाला खेद नको अशी लोकप्रबोधनपर गीते सादर करतो, आणि ही गीते ऐकण्याची वेळ ही पहाटेची असल्याने कानाला अगदी सुमधुर वाटतात आणि लोकं मोठ्या आनंदाने भरभरून बिदागी देतात अशी माहिती आकाश वाईकर याने 'पुढारी'शी बोलताना दिली.

कला विसरायला नको…
वासुदेव आपली कला सांगून जर स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करत असेल, तर ती कला विसरायची का? हा प्रश्न येणार्‍या पिढ्यांनी स्वतःला विचारला पाहीजे आणि ती वाचवण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहिले पाहिजे तर आणि तरच हे पारंपरिक कलेच वैभव टिकेल आणि तिचे उपकार परत फेडण्यासाठी आपण पुढाकार घेतोय याचा आनंद होईल. आजच्या सुशिक्षित आणि पुढारलेल्या नवयुवकांनी जर या कलेला आणखी नावीन्यता देवून तिला आधुनिकता दिली, तर या कलेला नवसंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही या वेळी आकाश याने व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT