पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या आरोग्य खाते हे लालफितीच्या कारभारात अडकले असून, शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय कर्मचार्यांच्या मनोवृत्तीपासून ते सेवा-सुविधांपर्यंत सर्वच पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. आरोग्य खात्याचा कारभार हाती घेऊन नऊ महिने झाले तरी अधिकारी ऐकत नाहीत, असे म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला घरचा आहेर दिला. जनसेवा फाऊंडेशनच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आरोग्य विभागाच्या दिरंगाईवर जाहीर नाराजी व्यक्त केली. शंभर कोटींचा प्रकल्प दिरंगाईमुळे पाचशे कोटींपर्यंत जातो आणि सरकार ठेकेदाराला अतिरिक्त पैसे देते.
मात्र, ऊन-पावसाची तमा न बाळगता आरोग्यदूत म्हणून काम करणार्या आशासेविकांना हजार-दोन हजार मानधन वाढवून द्यायचे म्हटले, तरी सरकार मागेपुढे पाहते, हे खेदजनक आहे, असेही त्यांनी नमूद केले. सावंत म्हणाले, ममाता सुरक्षित, जागरुक पालक-सुदृढ बालक किंवा नंदुरबार आदिवासी पट्ट्यामधील कुपोषण कमी व्हावे म्हणून आखून दिलेला 44 कलमी कार्यक्रम या सर्वच योजना आखून दिल्यानंतरही आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी त्या धोरणांची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत नाहीत. मी आखून दिलेल्या स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची अंमलबजावणी झाल्यास कुपोषणाचा मृत्यूदर शून्य टक्क्यांवर येऊ शकेल. आरोग्य खाते हे सर्वांत मोठे खाते असून अडचणीही तेवढ्याच आहेत.
कोव्हिड टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष साळुंखे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे नवीन कोव्हिड टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, बी. जे. मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकर्ते, आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोये, नवले मेडिकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार आदी सदस्यांचा समितीमध्ये समावेश आहे.