Tamhini Ghat records highest rainfall in India
पुणे: यंदा मान्सून हंगामात पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात देशात सर्वाधिक 8 हजार 923 मिलिमीटर, तर मेघालयातील मौसीनराम आणि चेरापुंजी भागात 17 सप्टेंबरपर्यंत सरासरी 7 हजार 303.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
देशातील सर्वाधिक पावसाच्या विक्रमासाठी प्रसिद्ध मौसीनराम आणि चेरापुंजीला मागे टाकत सलग दुसऱ्या वर्षी ताम्हिणी घाटाची नोंद देशातील सर्वात चिंब प्रदेश म्हणून झाली आहे.आजवर अनेक वर्षांपासून देशातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे राज्य म्हणून मेघालय राज्याची नोंद घेतली गेली. (Latest Pune News)
सुरुवातीला अनेक वर्षे चेरापुंजी यासाठी प्रसिद्ध होते. नंतर मौसीनराम या ठिकाणाची नोंद घेतली गेली. मात्र, महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील ताम्हिणी, महाबळेश्वर या ठिकाणांची नोंद हवामान विभागानेही घेतली नव्हती.
तथापि, इंडियन ट्रॉपीकल इन्स्टिट्यूट (आयआयटीएम) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन प्रकाश कुलकर्णी, डॉ. डी. आर. कोठावळे, डॉ. एन. आर. देशपांडे, डॉ. एस. जी. नारखेडकर यांनी सतत काही वर्षे ताम्हिणी घाटातील पर्जन्यमानाची सूक्ष्म निरीक्षणे नोंदवत 2016 मध्ये नवी माहिती देणारा शोधनिबंध लिहिला. ‘भारताच्या पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील एक अज्ञात अतिवृष्टी केंद्र ताम्हिणी’ असे त्या शोधनिबंधाचे शीर्षक होते. यामुळे ताम्हिणी घाटाची नवी ओळख देशासह जगाला झाली.
घाटमाथ्यावरील यंदाचा पाऊस
ताम्हिणी----------8,923
शिरगाव----------7,190
आंबोणे-----------6,321
दावडी ------------6,902
डोंगरवाडी----------6,348
पोफळी------------5069
लोणावळा----------5,102
कोयना-------------5,789
महाराष्ट्रातील हवामान तज्ज्ञांनी लावला शोध
ताम्हिणी घाटात 2024 मध्ये 9 हजार 644 मि.मी.ची नोंद झाली होती. यंदादेखील हा आकडा 9 हजार मि.मी.च्या जवळ गेला आहे. त्या तुलनेत चेरापुंजी अन् मौसीनराम अजूनही मागे आहे. 17 सप्टेंबर 2025 च्या स्थितीची ही नोंद आहे.
भारताच्या पश्चिम घाटाच्या (डब्ल्यूजी) उत्तरेकडील बाजूला असलेल्या ताम्हिणी या स्थानकावर सरासरी 6,498.4 मि.मी. मान्सूनचा पाऊस पडतो. हे निरीक्षण तज्ज्ञांनी प्रथम 2016 मध्ये पटवून दिले. त्यात त्यांनी सुरुवातीलाच असे निरीक्षण नोंदवले की, या स्थानकावर भारतातील कोणत्याही हवामान संस्थेची नोंद नाही. म्हणून, अशा अतिवृष्टी केंद्राचे अस्तित्व अज्ञात राहिले.
या अभ्यासात, ताम्हिणी घाटातील पावसाची अनेक वैशिष्ट्ये आढळली. जी अनेक वर्षे मान्सून हवामान शास्त्रज्ञांनाच अज्ञात होती.
सन 1975 ते 2013 या वर्षांच्या कालावधीतील मान्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) ताम्हिणीच्या रोजच्या पावसाच्या आकडेवारीचे सांख्यिकीय विश्लेषण केले.
विश्लेषणातून असे दिसून आले की, पश्चिम घाटाच्या बाजूला असूनही ताम्हिणीचा मान्सून पाऊस वाऱ्याच्या दिशेने असलेल्या स्थानकांपेक्षा जास्त आहे.
पर्वतांच्या बाजूला पाऊस कमी पडतो, हे मत या व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या मताच्या विरुद्ध आहे.
गत आठ वर्षांत ‘अल निनो’ नसलेल्या वर्षात चेरापुंजीत कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात एका दिवसात 695 मि.मी., तर तीन दिवसांत सरासरी 1,055 मि.मी. पाऊस पडतो.
काही स्थानकांवर जसे की, मुळशी-कॅम्प, शिरगाव, दावडी आणि आंबोणे येथेही मान्सून हंगामात जास्त पाऊस पडतो. मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस, ओला कालावधी, पर्जन्यमान ट्रेंड, याचा अभ्यास 33 वर्षांत करण्यात आला.
ताम्हिणी घाटातच जास्त का? हवामान तज्ज्ञांची निरीक्षणे...
अरबी समुद्रापासून हा भाग जवळ आहे, त्यामुळे हवेचे दाब ताम्हिणी घाटासाठी अनुकूल असतात.
अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर या भागात सतत जास्त आहे.
गुजरात राज्यात गत दोन वर्षांपासून अतिवृष्टीचे प्रमाण वाढले. तेथील किनारपट्टीकडून ताम्हिणी घाटात सर्वाधिक पाऊस येत आहे.
ताम्हिणीसह महाबळेश्वर,कोयना, लोणावळा या घाटमाथ्यावरील भागांत पावसाचे प्रमाण विक्रमी आहे.