लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुका आणि बिबट्या हे जणू समीकरण झाले आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्यांचे शेतक-यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले सुरू आहेत. मात्र, हे रोखण्यात वन विभागाला पूर्णपणे अपयश आले आहे. मात्र, याचा फटका शेतक-यांना बसत आहे. परिणामी, हल्ले रोखा अथवा नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
पाळीव जनावरांची बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी लाखो रुपये शेतकरी खर्च करत आहेत. यासाठी शासनाने किंवा वन विभागाने मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. हल्ल्यात मृत जनावरांचे पंचनामे होऊन त्यांची भरपाई मिळते. मात्र, पंचनामे वेळेवर होतील का नाही, याबाबत खात्री नसते. वन विभागाचे कर्मचारी नेमून दिलेल्या गावात राहात नाही. तरीही घटना घडल्यास वन विभागाच्या वतीने पंचनामे होतात. अनेकवेळा पंचनामे होऊनही भरपाई मिळत नाही. यामुळे शेतक-यांचा संयम तुटत चालला आहे.
पाळीव जनावरांचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी शेतक-यांनी पाळीव जनावरांच्या गोठ्याला तारेची अथवा भिंतींची कुंपणे घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात शेतक-यांना लाखो रुपये खर्च येत आहे. कुंपणे घालूनही अनेक ठिकाणी बिबट्याने उड्या मारून जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत.
यासाठी वन विभाग अथवा शासनाने शेतकर्यांना आर्थिक मदत करावी किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, वाळूंजनगरचे माजी सरपंच महेंद्र वाळूंज,वडगावपीरच्या सरपंच मीरा पोखरकर, मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक, लाखणगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे, धामणीच्या सरपंच रेश्मा बो-हाडे, जारकरवाडीच्या सरपंच अॅड.रूपाली भोजणे व शेतकरीवर्गातून होत आहे.
भरवशाचा दुधाचा धंदाही संकटात
शेतक-यांच्या अंदाजानुसार आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात सुमारे 500 बिबटे असावेत. वन विभाग मात्र या परिसरात किती बिबटे असावेत याचा अंदाजही लावू शकत नाही. मागील काही वर्षांपासून शेतमालाला अल्पभाव, चक्रीवादळ,अतिवृष्टी, कोरोना आदी संकटांनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र, तरीही पाळीव जनावरांपासून मिळणा-या दुधावर आपला प्रपंच शेतकरी सांभाळत आहे. मात्र, वाढत्या हल्ल्यांमुळे त्या उत्पन्नावरही पाणी पडत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.