नरेंद्र साठे
पुणे : जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये पुरुषांचीच संख्या जास्त. अनेकदा पदाने कनिष्ठ असलेल्या महिला कर्मचार्यांचा अनादर केला जात होता. हे थांबले पाहिजे म्हणून पुणे जिल्हा परिषदेने थेट आदेशच काढला. महिला अधिकारी, कर्मचार्याला आदराची वागणूक देण्याबाबत तो आदेश होता. अशा पद्धतीचा आदेश काढल्याने आम्हाला सहकार्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल झाल्याचे येथील महिला सांगतात.
पुणे जिल्हा परिषदेतील मुख्यालयात सुमारे 230 महिला अधिकारी, कर्मचारी आहेत. या महिला कर्मचार्यांसाठी जिल्हा परिषदेने अनोखे पाऊल टाकल्याने महिला कर्मचारी त्यांनी काम केलेल्या इतर कार्यालयांपेक्षा सध्याच्या कार्यालयात सुरक्षित वाटत असल्याचे नमूद करतात. त्यामागे काही कारणे महत्त्वाची ठरली. महिलांसाठी वेगळा फोरम निर्माण करण्यात आला. सखी कक्ष निर्माण करून मासिक पाळीदरम्यान महिलांना आराम करण्याची व्यवस्था येथे करण्यात आली.
त्यानंतर सर्वांत चांगला निर्णय घेतला तो पुरुषांकडून आदराची वागणूक मिळण्यासाठी प्रशासनाकडून काढण्यात आलेला आदेश. याबाबत सामान्य प्रशासन विभागातील निवेदिता देशमुख म्हणाल्या की, अशा प्रकारचा आदेश आमच्यासाठी काढला जाऊ शकतो, हे आम्हाला कुणाला माहीत नव्हते. परंतु, यामुळे खूप मोठा फरक जाणवतो. महिला थेट कुणी बोलत नाहीत.
कार्यालयातील व्यक्तीच आता आदराने आमच्याशी बोलत असल्याने बाहेरून येणारी मंडळी देखील तेवढ्याच आदराने बोलतात. काम करताना पुरुष अधिकारी, कर्मचार्यांकडून नकळतपणे किंवा जाणीवपूर्वक वेळोवेळी महिला कर्मचार्यांचा अनादर होतो. एकेरी नामोल्लेख केला जातो, असे निदर्शनास आल्याने तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी महिला कर्मचार्यांना आदराची वागणूक देण्याचा आदेश जारी केला.
आदेशानंतर खूपच बदल झाला. फोनवर देखील संवाद व्यवस्थित आणि आदरपूर्वक होण्यास सुरुवात झाली. आदेशाची गरज होती किंवा नाही, हे सांगता येणार नाही. परंतु, आदेशानंतर जिल्हा परिषदेत काम करताना, वावरताना आदराची वागणूक मिळत आहे, एवढे नक्की!
– वर्षा भिडे, शाखा अभियंता
काय म्हटले आहे आदेशात..?
महिला अधिकारी किंवा कर्मचार्यांच्या अनादरामुळे पुरुषांविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होते. कार्यालयामध्ये विसंवाद होतो तसेच यामध्ये महिला कर्मचारी यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे कौटुंबिक वातावरणसुद्धा अविश्वासाचे होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिला कर्मचार्यांशी आदराने बोलणे, एकेरी नावाचा उल्लेख करू नये. वातावरण आनंदी राहण्याची दक्षता घेण्याचे आदेशात नमूद केले आहे.